कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन

नवी मुंबई – शासनाच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागाने पाचही जिल्ह्यांत आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन केले आहे. राज्यात प्रथमच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आली आहे. या ‘वॉर रूम’साठी १८००२ ६७८४६६ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. या वॉर रूममधून सामान घेऊन येणार्‍या गाड्या ‘ट्रॅक’ केल्या जातील. गाड्या ज्या ठिकाणाहून निघतील, तेथून बाजार समितीपर्यंत येईपर्यंत जी.पी.एस्.द्वारे माहिती ठेवण्यात येईल. यामुळे बाजार समितीमधील गर्दी नियंत्रण आणि गाड्यांची आवक अगोदरच कळणे निश्‍चित होणार आहे. अशा पद्धतीचा प्रयोग कोकण विभागात प्रथमच होत आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.