कोरोनाविरोधात लढण्यासाठी सैन्य सज्ज ! – सैन्यदल प्रमुख

नवी देहली – कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य पूर्ण सामर्थ्य देईल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांनी केले.

जनरल नरवणे पुढे म्हणाले,

१. केवळ ६ घंट्यांच्या सूचनेवर सैन्याकडून ४५ खाटांचे ‘आयसोलेशन वॉर्ड’ (विलगीकरण कक्ष) आणि १० खाटांचे ‘आय.सी.यू.’ (अतीदक्षता विभाग) सिद्ध केले जाऊ शकते.

२. सर्व सैन्य कमांडर, प्रमुख अधिकारी आणि सल्लागार सतत बैठका घेऊन या विषयावर चर्चा करत आहेत. गेल्या २-३ मासांत सैन्याला विविध स्तरांवर प्रशिक्षणही दिले जात आहे. मी स्वत: प्रतिदिन त्याचा आढावा घेत आहे.

३. आतापर्यंत विदेशातून आणलेल्या १ सहस्र ४६२ भारतियांना सैन्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यातील ३८९ लोकांना विलगीकरण पूर्ण झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. सध्या मानेसर, हिंडन, जैसलमेर, जोधपूर आणि मुंबई येथे सैन्याकडून १ सहस्र ७३ जणांची देखभाल केली जात आहे.