रिझर्व्ह बँकेकडून विविध कर्जांच्या व्याजदरात कपात

मुदतीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ३ मासांपर्यंतची सवलत

नवी देहली – देशभरात दळणवळण बंदी लागू असतांना अर्थव्यवस्था आणि कर्जभार असलेल्या व्यक्ती यांना आधार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध कर्जांच्या व्याजदरात कपात केली. मुदतीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ३ मासांपर्यंतची सवलत दिली आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २७ मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्यांची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. यामुळे गृह, वाहन यांसह इतर कर्जांचा व्याजदर न्यून होणार असून ग्राहकांच्या मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे. बँकेने ‘रिव्हर्स रेपो रेट’ (विविध बँकांचे रिझर्व्ह बँकेमध्ये जमा असणार्‍या पैशांवर त्या बँकांना मिळणारे व्याज) ०.९० टक्के घटवून ४ टक्के केला आहे. बाजारातील रोख रक्कमेची उपलब्धता ‘वाढवण्यासाठी वैधानिक रोखता प्रमाणा’चा (‘एस्.एल्.आर्.’चा) दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे येत्या ३० जूनपर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम उपलब्ध होणार आहे.