विदेश दौर्‍याची माहिती शासनाला न दिल्याने हिंगोली येथे एकावर गुन्हा नोंद

कोरोनाचे जीवघेणे संकट दिवसेंदिवस वाढत असतांना मनमानीपणे शासकीय आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे, हे समाजाच्या दृष्टीने हितावह आहे !

धामणगाव बढे (हिंगोली) – विदेश दौर्‍याची माहिती लपवल्याच्या प्रकरणी येथील धामणगाव परिसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी येथील ग्रामसेवक पंजाबराव मोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. ही व्यक्ती १३ मार्च या दिवशी सौदी अरेबियातून मुंबई विमानतळावर, तर १४ मार्च या दिवशी धामगाव बढे येथे आली. कोरोनाबाधित देशातून प्रवास केल्यानंतरही त्याची माहिती कोरोना नियंत्रण कक्ष आणि एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष येथे दिली नाही. वास्तविक १४ मार्च या दिवशीच्या अधिसूचनेनुसार ती देणे बंधनकारक आहे. याविषयी माहिती मिळाल्यानंतर धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश नारखेडे यांनी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद झाला आहे.