कोरोनामुळे जगभरात १९ सहस ६०७ जणांचा मृत्यू

उपचारानंतर १ लाख ११ सहस्र ८७० रुग्ण झाले बरे

नवी देहली – कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता १९ सहस्र ६०७ झाली आहे. एकूण १७५ देशांत ४ लाख ३४ सहस्र ९८३ रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या अजून जास्त असण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. असे असले, तरी कोरोनाची लागण झालेले १ लाख ११ सहस्र ८७० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

१. इटलीत एकूण ६९ सहस्र १७६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर तेथे आतापर्यंत ६ सहस्र ८२० जणांचा मृत्यू झाला आहे. येथील ८ सहस्र ३२६ जण या रोगातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

२. चीनमध्ये ८१ सहस्र २१८ रुग्ण असून तेथे आतापर्यंत ३ सहस्र २८१ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे ४७ नवीन रुग्ण सापडले आहेत.

३. स्पेनमध्ये ४७ सहस्र ६१० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून तेथे एकूण ३ सहस्र ४३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

४. इराणमध्ये एकूण २७ सहस्र १७ जण कोरोनाग्रस्त असून २ सहस्र ७७ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत.

५. फ्रान्समध्ये एकूण २२ सहस्र ३०४ जणांना कोरोनाची लागण झालीझाला असून १ सहस्र १०० जण मरण पावले आहेत.

६. अमेरिकेत आतापर्यंत ५४ सहस्र ९६८ जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे, तर ७८४ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे.