नवी देहली – देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५८८ झाली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तमिळनाडू आणि देहली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याचसमवेत देशाच्या वेगवेगळया भागांतील कोरोनाची बाधा झालेले ४८ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा चालूच रहाणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशभरात ‘दळणवळण बंदी’ घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्याशी उशिरा संवाद साधला. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘देशातील नागरिकांनी घाबरू नये. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा चालू रहाणार आहे’, असे ट्वीट केले.
रेल्वेसेवा १४ एप्रिलपर्यंत बंद रहाणार
देशभरात ‘दळणवळण बंदी’ घोषित झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानेही मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घोषित केला आहे. प्रवासी वाहतूक बंद असली, तरी देशात आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्या चालूच रहाणार आहेत. प्रवाशांनी ऑनलाइन बूक केलेली तिकीटे रहित न करता त्यांना त्यांच्या तिकिटांची रक्कम आपणहून देण्यात येणार आहे, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
३० जूनपर्यंत ए.टी.एम्. शुल्क रहित !
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी घोषणा केली आहे की, कोणत्याही बँकेच्या ए.टी.एम्.मधून पैसे काढल्यास आकारले जाणारे शुल्क ३० जूनपर्यंत रहित करण्यात आले आहे. तसेच बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याची अटही ३० जूनपर्यंत रहित केली आहे.