‘ती’ सूची पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद होणार ! – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

डॉ. अभिनव देशमुख

कोल्हापूर – कोरोनाबाधित असा अपप्रचार करून परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची सूची सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद केला जाईल, अशी चेतावणी डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. जे लोक परदेशातून प्रवास करून आले आहेत, अशा लोकांना घरामध्ये अलगीकरण करण्यास सांगितले आहे. काही जणांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे अशांचा अपप्रचार करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलीस अधीक्षकांनी कळवले आहे.

ही माहिती ‘जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूर’ यांच्या वतीने फिरत आहे; मात्र अशी कोणतीही माहिती जिल्हा कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेली नाही, असा खुलासा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केला आहे. हीच माहिती विविध जिल्ह्यांत जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या नावाने फिरत आहे.