३ फेब्रुवारी या दिवशी हिंगणघाट येथील शिक्षिकेला सकाळी ७.३० च्या सुमारास पेेट्रोल टाकून जाळण्यात आलेे. ४० टक्के भाजलेल्या पीडित शिक्षिकेनेे मृत्यूशी झुंज देत १० फेब्रुवारी या दिवशी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. ‘आरोपीला कठोर शिक्षा लवकरात लवकर व्हायला हवी. त्यालाही पीडितेप्रमाणे वेदना द्यायला हव्यात, अजून अशा किती घटना घडत राहणार ?, आंध्रप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्येही कायदा करायला हवा…’ या आणि यासारख्या उद्विग्न प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. घटना घडून ७ दिवस होऊनही आरोपीवर विशेष कारवाई झालेली नाही आणि पीडितेचा मात्र मृत्यू झाला, ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यामुळे पीडितेच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या संकटाची तीव्रता किती असेल, हे शब्दांत सांगायला नको.
पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर ‘आरोपीला त्वरित शिक्षा व्हावी’, ही भावना सरकारपर्यंत पोचवण्यासाठी गावकर्यांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळत नसल्याने पीडितेचा मृतदेह गावात आणण्याच्या वेळी गावकर्यांनी दगडफेक केली. दिवसभर पुन्हा एकदा राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य सर्व यांनी पुन्हा एकच सूत्र लावून धरले, ‘झालेली घटना अतिशय वाईट आहे. नराधमाला लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी. कायदे कठोर करायला हवेत. पुन्हा असा बळी न जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत…’ इत्यादी.
वरील प्रसंगातून एकच सूत्र प्रकर्षाने समोर येते, ते म्हणजे घटना घडते, तेव्हा सर्वांच्या मनामध्ये अन्यायाविरुद्धची आग भडकते. सर्वजण भावनेच्या भरात बरीच आश्वासने देतात. काळाच्या ओघात भावनिक स्तरावर निर्माण झालेली आग पुन्हा शांत होते. वर्ष २०१२ मध्ये घडलेल्या देहलीतील निर्भया प्रकरणाच्या वेळीही असेच झाले. तिच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी वर्ष गेले. न्यायालयाने वर्ष २०१३ मध्ये आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली; परंतु अजूनही त्यांना फाशी देण्यात आलेली नाही. महिलांवरील अतिशय संवेदनशील प्रसंगांकडे अशा प्रकारे असंवेदनशीलतेने पाहिले जात असेल, तर ‘भारतामध्ये स्त्री कधीतरी सुरक्षित राहील का ?’, असा प्रश्न सर्वांच्या मनात येईल.
समाजातील विकृत मनोवृत्ती पालटेपर्यंत आणि पुन्हा अशा घटना घडायला नकोत, यासाठी अन्यायाविरुद्धची चीड धगधगत ठेवून ठोस कृती करणे आवश्यक आहे. पोलीस, प्रशासन, राजकीय नेते, अधिवक्ते, गावकरी आणि कुटुंबीय सर्वांच्याच मनात अशा प्रसंगानंतरची आग धगधगत राहणार का ?
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.