निरोगी जीवनासाठी व्यायाम ५३
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’ (ergonomics) चे तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम’ यांची माहिती सादर करणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण आता उन्हाळा चालू असल्याने ‘उन्हाळ्यातही व्यायाम करणे का आवश्यक आहे ?’, ते जाणून घेऊया.
१. ‘चरक संहिता’, ‘सुश्रुत संहिता’ यांत ‘व्यायाम नियमित करावा’, असे सांगितले असणे
उन्हाळा चांगलाच चालू झाला आहे. ‘उन्हाळ्यात व्यायाम करण्याची आवश्यकता नसते’, अशी अनेक जणांची समजूत असते; पण ही समजूत योग्य नाही. व्यायाम ही सतत १२ मास करण्याची गोष्ट आहे. आपल्या ‘चरक संहिता’, ‘सुश्रुत संहिता’ यांत सांगितलेल्या दिनचर्येत तोंड धुणे, स्नान, भोजन वगैरे ज्या गोष्टी नित्य करण्यास सांगितल्या आहेत, त्यांत व्यायामाचाही समावेश केला आहे. ‘ऋतुमानाप्रमाणे व्यायामाचे प्रमाण अन् प्रकार यांत पालट करावा’, असे सुचवले आहे; पण ‘व्यायाम नित्य नियमितपणे करावा’, असे सांगितले आहे.
२. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे अन्न सेवन करतो, त्याप्रमाणे उन्हाळ्यातही व्यायाम करणे आवश्यक !
हिवाळ्यात शरिरातील उष्णता नियमित राखून ठेवण्यासाठी अधिक आहार घ्यावा लागतो आणि त्यांत तूप, लोणी, तेल अशा प्रकारच्या स्नेहयुक्त (स्निग्ध) पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढवावे लागते. उन्हाळ्यात त्या मानाने अन्नाची आवश्यकता अल्प असते, तरीही आपण अन्न सेवन करणे, अगदीच बंद करत नाही. तीच स्थिती व्यायामाबद्दलची आहे.
३. आपल्या शरिरातील निरनिराळ्या इंद्रियांच्या क्रिया नीट चालण्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक !
उन्हाळ्यात हिवाळ्यापेक्षा व्यायामाचे प्रमाण न्यून करावे; मात्र व्यायाम अगदी बंद ठेवणे फार अयोग्य आहे. उन्हाळ्यात आपण थंड पाण्याने स्नान करतो आणि थंडीत ऊनपाणी घेतो; पण स्नान करणे टाळत नाही. आपण पहातो की, उन्हाळ्यातही प्रतिदिन सर्व प्रकारची शारीरिक श्रमाची कामे चालू असतात. शेतकर्याला तर थंडीत, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात शेतीची कामे करावीच लागतात. त्यामुळे शेतकरी काटक होतो. त्याचे आरोग्य उत्तम रहाते. शेतकरी पावसात भिजल्यास त्याला सर्दी होत नाही किंवा त्याने उन्हात काम केल्याने त्याला ताप येत नाही. यावरून उन्हाळ्यात व्यायाम केल्याने अपाय तर होणार नाहीच, उलट आरोग्य चांगले रहाते, असे दिसते. आपल्या शरिरातील निरनिराळ्या इंद्रियांच्या क्रिया नीट चालण्यासाठी नियमित व्यायाम करणे अगदी आवश्यक आहे.
४. व्यायाम करण्याकडे मनुष्याची सहज प्रवृत्ती असायला हवी !
‘उन्हाळ्यात व्यायाम केल्याने उन्हाळा अधिक भासण्याच्या ऐवजी न्यून भासतो’, असा अनुभव आहे, तरी ‘याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा’, अशी आमची वाचकांना सूचना आहे. व्यायाम करण्याकडे मनुष्याची सहज प्रवृत्ती असायला हवी; पण आम्ही आमची राहणी कृत्रिम करून शरिराचा जोम न्यून करून घेतला आहे आणि म्हणूनच ‘व्यायाम करा, व्यायाम करा, उन्हाळ्यातसुद्धा व्यायाम करा’, असे सांगण्याची आवश्यकता उत्पन्न झाली आहे. उन्हाळ्यात सकाळी अथवा सायंकाळी थंड वेळेत व्यायाम करणे अवश्य चालू ठेवावे.’
(साभार : शं. धों. विद्वांस, संपादक, मासिक ‘व्यायाम’, १५.४.१९५२)
या लेखमालेचा यापुढील भाग आपण येथे वाचू शकता : https://sanatanprabhat.org/marathi/905088.html