संपादकीय : ‘इव्हीएम्’च कायम ! 

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गॅबर्ड

डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून जगभरातच नव्हे, तर अमेरिकेतही गदारोळ निर्माण झाला आहे. ट्रम्प ४ वर्षांपूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्या वेळी मोठा हिंसाचार झाला होता. त्यांनी मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयात खटलाही प्रविष्ट (दाखल) करण्यात आला होता. त्या वेळी ट्रम्प यांनी यापुढे ‘इव्हीएम्’ऐवजी म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान करण्याची मागणी केली होती. आताच्या निवडणुकीत ते याच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानातूनच निवडून आले आहेत. आता अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबर्ड यांनी ट्रम्प यांच्या उपस्थितीत कागदी मतदान पत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत अशा प्रकारचा निर्णय झाला, तर आश्चर्य वाटणार नाही.

गॅबर्ड यांनी अमेरिकेत मागणी केल्यावर भारतात काँग्रेसच्या नेत्याने पुन्हा अशीच मागणी केली आहे. त्याने निवडणूक आयोगाला याविषयी विचारणा केल्यावर निवडणूक आयोगाने तांत्रिकदृष्ट्या अमेरिका आणि भारत यांच्यातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांतून होणार्‍या मतदानातील भेद स्पष्ट करत भारतातील मतदान अमेरिकेपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी सर्वाेच्च न्यायालयातही या संदर्भात अनेक याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. त्यावर न्यायालयाने व्हिव्हिपॅटची पडताळणी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार निवडणूक आयोग कार्यवाही करत  आहे; मात्र कुठे तांत्रिक अडचण येण्याच्या व्यतिरिक्त यात त्रुटी आहे किंवा घोटाळा करण्यात येत आहे, असे कधीच समोर आले नाही. त्याविरोधात आरोप करणारेही पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आक्षेप योग्य आहेत, हे अद्यापतरी उघड झालेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अमेरिकेत पुढे काय निर्णय घेतला जाणार आहे, हे काळच ठरवेल; मात्र भारतात तरी मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारेच होईल, यात शंका नाही; कारण ज्या विरोधी पक्षांकडून अशी मागणी केली जाते, तेच वेळोवेळी या यंत्राद्वारे करण्यात आलेल्या मतदानातूनच सत्तेत बसले आहेत. त्या वेळी त्यांनी यावर आक्षेप घेतला नाही; मात्र पराभूत झाल्यावर आक्षेप घेत असतात. त्यामुळे ईव्हीएम यंत्र कायम रहाणार.