आतंकवादी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाने कुणाकुणाचे बुरखे फाटणार ?

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेले आक्रमण हे भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठे आतंकवादी आक्रमण होते. यात आतंकवादी हाफिज सईदची ‘लष्कर-ए-तोयबा’ ही जिहादी संघटना, ‘आय.एस्.आय.’ ही पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आणि पाक लष्कर यांचा हात होता. या कटाला पाक सरकारचा सक्रीय पाठिंबा होता. या आक्रमणासाठी आवश्यक असलेली मािहती मिळवण्याचे आणि त्या आधारे आक्रमणाचे विस्तृत नियोजन करण्याचे काम आतंकवादी डेव्हिड कोलमन हेडली आणि तहव्वूर राणा या दोघांनी पार पाडले होते. जिथे प्रत्यक्ष आक्रमण झाले, त्या जागा सोडून त्यांनी जिथे रेकी केली, त्यामध्ये ‘सदर्न नेव्हल कमांड’, ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’, देहली, कुंभमेळा, पुष्कर मेळा, हवाई दल आणि नौदल यांच्या निवृत्त अधिकार्‍यांची पवईतील वसाहत ‘जलवायू विहार’ अशा विविध ठिकाणांचा समावेश होता. याचा अर्थ ही योजना केवळ मुंबई पुरतीच मर्यादित नव्हती, तर देशातील इतर अनेक ठिकाणांचा यात सहभाग होता. भारताची प्रतिष्ठा आणि शक्ती यांचा स्रोत असलेल्या या ठिकाणांवर आपण हवे तेव्हा आतंकवादी आक्रमणे करू शकतो, हा त्यांना विश्वास होता; कारण देशाच्या अंतर्गत सुरक्षेची स्थिती तेव्हा दयनीय होती. बाँबस्फोट आणि त्यात होणारे शेकडोंचे मृत्यू या नियमित घडणार्‍या घटना होत्या. काँग्रेस नेते पी. चिदंबरम् गृहमंत्री असतांना ‘आयबी’ गुप्तचर यंत्रणा आणि ‘सीबीआय’ यांच्यातील भांडणे इतकी टोकाला गेली होती की, त्यांचे अधिकारी एकमेकांना अटक करण्याच्या सिद्धतेत होते.

मुंबईतील आक्रमणातील मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा

१. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष तणावाखाली का ?

अमेरिकेतील चौकशीच्या वेळी हेडली हा माफीचा साक्षीदार होऊन खटल्यातून मुक्त झाला. तहव्वूर राणा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे प्रदीर्घ प्रयत्न आणि कुशल मुत्सद्देगिरी यांमुळे भारताच्या कह्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये उडालेली खळबळ आपण समजू शकतो. ‘आय.एस्.आय.’, पाक लष्कर आणि सरकार यांतील कोण लोक या कटात सहभागी होते, ही माहिती राणाने उघड केली, तर पाकिस्तानची आधीच रसातळाला गेलेली प्रतिमा अधिकच काळवंडेल. प्रश्न हा आहे की, काँग्रेस इतकी तणावाखाली का आली आहे ? देशप्रेम आणि राष्ट्राभिमान यांची थोडीतरी चाड असलेल्या कुठल्याही पक्षाने राणाच्या प्रत्यार्पणाचे एकमुखाने कुठल्याही पण-परंतुविना स्वागत केले असते. काँग्रेस मात्र आनंदाचा आणि स्वागताचा एक शब्दही न काढता यावर काय प्रतिक्रिया द्यावी ? या गोंधळात पडलेली दिसते. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना राणाला पुरेसे कायदेशीर साहाय्य मिळते कि नाही ? याची चिंता पडलेली दिसते, तर चिदंबरम् यांना या प्रत्यार्पणाचे श्रेय मोदींना मिळेल कि काय याची ?

२. काँग्रेसच्या विचित्र वागण्यामागील काही महत्त्वाचे पैलू

त्या काळातील काँग्रेसची धोरणे या आक्रमणाच्या वेळची आणि नंतरची त्यांची वागणूक यांवर दृष्टी टाकली, तर आज त्यांच्यावर आलेली अवघड परिस्थिती समजून घेता येते. यातील काही महत्त्वाच्या पैलूंकडे पाहूया.

श्री. अभिजित जोग

अ. काँग्रेसकडून ‘भगव्या आतंकवादा’चे षड्यंत्र : त्या काळात काँग्रेस ‘भगवा आतंकवाद’ हा एक काल्पनिक सिद्धांत प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. ‘समझोता एक्सप्रेस ब्लास्ट’ प्रकरणात अटक झालेल्या पाकिस्तानी आतंकवाद्यांना सोडून देऊन स्वामी असीमानंद यांना अटक करण्यात आली होती. मालेगाव स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांना अटक करण्यात आली होती. नुकत्याच उघड झालेल्या माहितीनुसार प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनाही अटक करण्याची सिद्धता झाली होती. गृहखात्याचे एक अधिकारी आर्.व्ही.एस्. मणी यांनी या कटात सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा कसा छळ करण्यात आला, याचे वर्णन त्यांनी त्यांच्या ‘The Myth of Hindu Terror: Insider Account of Ministry of Home Affairs 2006 – 2010’ या पुस्तकात विस्ताराने केले आहे. इस्लामी आतंकवादाचा बचाव करणे आणि काँग्रेसला प्रभावी विरोध करणार्‍या भाजप अन् संघ परिवार यांचा कायमचा काटा काढणे, ही दोन्ही उद्दिष्टे ‘हिंदु आतंकवाद’ हे नकली (खोटे) वास्तव प्रस्थापित करून साध्य होणार होती. यातील एकाही प्रकरणात कुठलाही विश्वासार्ह पुरावा काँग्रेस सरकार कधीही सादर करू शकले नाही.

आ. २६ नोव्हेंबर २००८ आक्रमणाचे खापर हिंदूंच्या माथी मारण्याचा काँग्रेसचा अट्टहास : २६ नोव्हेंबर २००८ या दिवशीचे आक्रमण हे या प्रयत्नातील मोठे षड्यंत्र होते. यातील सर्व१० आतंकवाद्यांकडे हिंदु नावांची ओळखपत्रे होती. त्यांनी हातात धागे (कलावा) बांधले होते. ते सर्वजण या आक्रमणात मारले जातील, अशी योजना होती, म्हणजे त्यांच्या ओळखपत्रांवरून त्यांना ‘हिंदु आतंकवादी’ घोषित करता आले असते आणि ‘मुसलमानांनी केला नाही इतका रक्तपात हिंदु आतंकवाद्यांनी केला’, असे चित्र उभे करून हिंदूंना कायमचे कलंकित करता आले असते. देशाचे भाग्य थोर की हुतात्मा पोलीस तुकाराम ओंबाळे यांनी जिवावर उदार होऊन कसाबला जिवंत पकडले आणि पुढील चौकशीत हे सर्व आतंकवादी पाकिस्तानी असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले. अन्यथा ‘हे आक्रमण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले’, अशी मांडणी करणारे एस्.एम्. मुश्रीफ (माजी पोलीस अधिकारी) यांचे पुस्तकही सिद्ध होते. काँग्रेसचा निर्लज्जपणा इतका की, हा पाकिस्तानचा डाव असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आणि त्याला काँग्रेस नेते दिग्विजयसिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, म्हणजे ‘समझोता ब्लास्ट’प्रमाणेच या प्रकरणातही पाकिस्तानी आतंकवाद्यांना मोकळे सोडून हिंदूंवर खापर फोडण्याचा काँग्रेसचा अट्टाहास होता, हे स्पष्ट आहे.

इ. राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या कमांडोंना आणण्यास झालेला विलंब : हे आक्रमण चालू असतांना मानेसर येथील तळावरून ‘एन्.एस्.जी.’ (राष्ट्रीय सुरक्षा रक्षक) कमांडोंना देहलीला आणण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध होण्यात पुष्कळ वेळ गेला. देहलीहून या कमांडोंच्या विमानातून मुंबईला जाण्याचा हट्ट तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी धरला. त्यांना विमानतळावर येण्यास उशीर झाल्यामुळे कमांडोज २ घंटे विमानातच बसून होते. या कालावधीत मुंबईत नरसंहार चालूच होता.

ई. पाकवर आक्रमण करण्याविषयी तत्कालीन पंतप्रधानांचे मौन : त्या वेळचे हवाईदल प्रमुख फली होमी मेजर यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेसचे डॉ. मनमोहन सिंह यांना सल्ला दिला होता की, या आक्रमणाचा प्रतिशोध म्हणून पाकिस्तानवर आपण ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला पाहिजे, ज्यासाठी आम्ही १८ ते २४ घंट्यात सज्ज होऊ शकतो; पण मनमोहन सिंह यांनी नेहमीप्रमाणे यावर केवळ मौन धारण केले.

उ. काँग्रेसचे राष्ट्रघातकी आणि राजकीय लाभाचे उदाहरण : बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात या प्रकरणाविषयी लिहिले आहे. ते लिहितात, ‘त्यांनी मनमोहन सिंह यांना नंतर विचारले की, तुमच्याकडे सगळे पुरावे असतांना इतक्या मोठ्या आतंकवादी आक्रमणाविरुद्ध तुम्ही पाकिस्तानवर काहीही कारवाई का केली नाही ? त्यावर मनमोहन सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली असती, तर देशात मुसलमानविरोधी वातावरण सिद्ध झाले असते आणि त्याचा लाभ भाजपला मिळाला असता. म्हणून आम्ही काहीही न करायचे ठरवले.’ याचाच अर्थ देशाच्या आत्मसन्मानापेक्षा काँग्रेसला राजकीय लाभाची गणिते महत्त्वाची होती कि पाकवर लष्करी कारवाई केली, तर ते या कटात सहभागी असलेल्या भारतियांची नावे उघड करतील, ही भीती यामागे होती ?

ऊ. हेडली आणि राणा यांना त्यांच्या रेकीमध्ये साहाय्य करणारा अन् चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांचा मुलगा राहुल भट याला काँग्रेस सरकारने का सोडून दिले ? हा प्रश्नही अनुत्तरितच आहे.

३. तहव्वूर राणा माहिती उघड करील, ही भीती काँग्रेसच्या विचित्र प्रतिक्रियांमागे नाही ना ?

वरील सगळी सूत्रे जोडल्यास या प्रकरणात सहभागी असलेले भारतीय लोक कोण आणि त्यांचे हेतू कोणते ? याची माहिती उघड होणे, हे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते; कारण ‘काँग्रेसचे ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) सिद्ध होईल’, अशी सिद्धता करून पाकिस्तानने या आतंकवाद्यांना का पाठवले ?… त्या बदल्यात त्यांना कुठल्या गोष्टी मान्य करण्यात आल्या होत्या ?… या प्रश्नांची उत्तरे याखेरीज मिळणार नाहीत. ही माहिती तहव्वूर राणा उघड करील, ही भीती तर काँग्रेसच्या विचित्र प्रतिक्रियांमागे नाही ना ?

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (१२.४.२०२५)