१३ एप्रिल या दिवशी ‘ऑपरेशन मेघदूत’ला ४१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने…
(टीप : पाकिस्तानचा सियाचिन परिसरात घुसखोरी करण्याचा डाव उधळणारी भारताच्या तिन्ही लष्करदलांची संयुक्त मोहीम म्हणजे ‘ऑपरेशन मेघदूत’ !)
भारताच्या लष्करी इतिहासात अनेक धाडसी मोहिमांनी स्वतःचा असा वेगळा एक ठसा उमटवला आहे आणि त्यातील एक महत्त्वपूर्ण मोहीम, म्हणजे ‘ऑपरेशन मेघदूत’. ही मोहीम भारताच्या तिन्ही लष्करी दलांनी विशेषतः भारतीय सैन्य आणि हवाई दल यांनी संयुक्तरित्या राबवलेली एक अत्यंत महत्त्वाची अन् ऐतिहासिक कारवाई होती. ‘ऑपरेशन मेघदूत’ १३ एप्रिल १९८४ या दिवशी चालू करण्यात आले आणि यामध्ये भारताने जगातील सर्वांत उंच रणभूमी असलेल्या सियाचिन हिमनगावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. या मोहिमेने भारताची लष्करी क्षमता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि सैनिकांचे अपार धैर्य यांचा परिचय संपूर्ण जगाला दिला. १४ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ऑपरेशन मेघदूत’ची आखणी का करण्यात आली ? आणि सियाचिन प्रदेशचे सामरिक महत्त्व’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/902674.html

३. सियाचिनविषयी झालेले करार
वर्ष १९६५ च्या भारत-पाक युद्धानंतर ‘ताश्कंद करार’ झाला, जो भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि पाकचे राष्ट्रपती अयुब खान यांच्यात झाला. या करारानुसार युद्धविराम रेषेला ‘नियंत्रण रेषा’ असे नाव देण्यात आले आणि सियाचिनला ‘नो मेन्स लँड’ (कोणत्याही देशाचा ताबा नसलेला भाग) घोषित करण्यात आले. भारताचा दावा होता की, नियंत्रण रेषा ही ‘एन्.जे. ९८४२’पासून थेट उत्तरेला जाते, तर पाकचा दावा होता की, ती पूर्व-उत्तरेला जाऊन काराकोरम खिंडीकडे वळते. या वेगवेगळ्या व्याख्यांमुळे दोन्ही देशांनी सियाचिन हिमनदीवरील निर्जन आणि बर्फाच्छादित भागावर स्वतःचा दावा सांगितला; मात्र वर्ष १९८४ पर्यंत हा भाग दोन्ही देशांच्या लष्करांनी कह्यात घेतलेला नव्हता.
४. प्रत्यक्षात राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन मेघदूत’
पाकिस्तानने या दावाहीन भागाकडे एक संधी म्हणून पाहिले; कारण हा भूभाग सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि अद्याप कुणाच्याही कह्यात नव्हता. त्यामुळे सियाचिन हिमनदीवर पाकिस्तानचा ताबा बसू नये; म्हणून भारताने ‘ऑपरेशन मेघदूत’ चालू केले. १९७० च्या दशकात कर्नल नरिंदर कुमार, जे भारतीय लष्करातील एक शिस्तप्रिय अधिकारी आणि गिर्यारोहक होते, त्यांनी काश्मीरचा एक अमेरिकन-निर्मित नकाशा पाहिला, ज्यामध्ये सियाचिन हिमनदीचा भाग पाकिस्तानमध्ये दाखवण्यात आला होता. पाकिस्तानने अनेक गिर्यारोहण मोहिमांना सियाचिन भागातील शिखरे पाकिस्तानच्या बाजूने सर करण्यासाठी केवळ अनुमतीच दिली नाही, तर या मोहिमांना पाक सरकारकडून परवाने दिले जात असत आणि सहसा पाक लष्कराचा एक अधिकारी या मोहिमांमध्ये समवेतही असे. या गिर्यारोहकांना पाक सैन्याने दिलेला नकाशा (जो जर्मन मोहिमेतील एका सदस्याकडून भारतीय गुप्तचर संस्थांना मिळाला) सियाचिनला पाकिस्तानचा भाग दाखवतो आणि ‘नियंत्रण रेषे’ला ‘एन्.जे. ९८४२’पासून काराकोरम खिंडीपर्यंत जोडतो.

या करामतीला उत्तर म्हणून भारतीय लष्कराने या भागाचा अभ्यास करण्यासाठी अनुमती घेतली. कर्नल बुल कुमार यांच्या नेतृत्वाखाली वर्ष १९७८ मध्ये मोहिम राबवण्यात आली आणि वर्ष १९८१ पर्यंत त्यांनी संपूर्ण सियाचिन हिमनदीचा चीनच्या सीमेपर्यंत नकाशा सिद्ध केला, तसेच साल्टोरो पर्वतरांगांपलीकडील भागाची छायाचित्रे आणि व्हिडिओ गोळा केले. वर्ष १९८४ मध्ये भारतीय गुप्तचर संस्थांना पाककडून ‘अबाबील’ नावाच्या मोहिमेची योजना असल्याचे समजले आणि त्यांनी लंडनमधून मोठ्या प्रमाणात अंटार्क्टिक वस्त्र, हिमालयात वापरावयाचे तंबू आणि गिर्यारोहण साहित्य खरेदी केल्याचेही लक्षात आले. या गुप्तचर अहवालाच्या आधारावर तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी ‘ऑपरेशन मेघदूत’साठी अनुमती दिली.
भारत सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर तेव्हाचे लष्करप्रमुख जनरल अरुण वैद्य यांनी उत्तर लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल पी.एन्. हूण आणि ब्रिगेडियर विजय चन्ना यांना साल्टोरो रांगा तात्काळ कह्यात घेण्याचे आदेश दिले. ही योजना ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’मध्ये (सुरक्षाविषयी मंत्रीमंडळ समितीसमोर) मांडली गेली आणि पंतप्रधान इंदिरा गांधींनी तिला तात्काळ संमती दिली. सियाचिन हिमनदीवर ‘ऑपरेशन मेघदूत’चे उत्तरदायित्व ‘कुमाऊं रेजिमेंट’च्या एका बटालियनवर सोपवण्यात आली. त्यांना ‘लडाख स्काऊट्स’च्या एका कंपनीने आणि ‘कुमाऊं’च्या आणखी २ कंपन्यांनी पाठिंबा दिला. संपूर्ण हिमवस्त्र आणि सुसज्ज उपकरणांनी सज्ज ‘कुमाऊं रेजिमेंट’ अन् ‘लडाख स्काऊट्स’चे सैनिक सियाचिन बेस कँपवर (सैन्य तळावर) जमले.
या मोहिमेपूर्वी सैनिकांनी कठोर प्रशिक्षण घेतले, ज्यामध्ये हिमावर जिवंत रहाण्याचे कौशल्य, बर्फावर चढाई (स्नो क्राफ्ट, आईस क्राफ्ट) आणि मानसिक अन् शारीरिक सिद्धता यांचा समावेश होता. ‘ऑपरेशन मेघदूत’चे नेतृत्व मेजर आर्.एस्. संधू यांनी केले. भारतीय हवाई दलाच्या ‘आय.एल्.-७६’ आणि ‘ए.एन्.-३२’ मालवाहू विमानांनी लेह येथे मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक सामग्री पोचवली. यानंतर कॅप्टन संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य दलाने सियाचिन हिमनदीवर उतरणी केली आणि बिलाफोंडला या महत्त्वाच्या दर्र्यावर हिंदुस्थानी निशाण फडकावले. अतिशय अल्पावधीत भारतीय लष्कराने सियाला, बिलाफोंडला आणि ग्योंगला हे ३ प्रमुख दर्रे अन् साल्टोरो रांगेवरील प्रमुख उंच शिखरे कह्यात घेतली. जेव्हा पाकिस्तानी सैन्य तिथे पोचले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आणि भारतीय लष्कराच्या जोरदार प्रतिकारात त्यांना मोठ्या प्रमाणात हानी सहन करावी लागली. नंतर पाकिस्तानने पश्चिम भागातील रांगेवर कब्जा केला, जिथून त्यांना भारतीय संरक्षण व्यवस्थेचा आढावा घेता येत होता आणि त्यांनी तेथून भारतीय तळावर आक्रमण चढवले. यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला आणि शेवटी पाक सैनिकांना माघार घ्यावी लागली अन् त्यांनी ती रांग रिकामी केली.
५. ‘ऑपरेशन मेघदूत’चा भारताला झालेला लाभ
‘ऑपरेशन मेघदूत’नंतर भारतीय सैन्य अत्यंत प्रतिकूल हवामान आणि कठीण भूभागात विजय मिळवलेले प्रदेश कायम कह्यात ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे, जे सीमा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पाकिस्तानने सियाचिन हिमनदीवरील नियंत्रण पुन्हा मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्न चालू ठेवले आणि अनेक मोहिमा राबवल्या; मात्र आजही भारतीय लष्कर सियाचिन हिमनदीचे ७६ किमी लांब आणि २५५३ चौरस किमी संपूर्ण क्षेत्र, तसेच तिच्या उपहिमनद्या, सर्व प्रमुख दर्रे आणि साल्टोरो पर्वतरांगेची उंच शिखरे कह्यात ठेवून आहे.
सियाचिनवर नियंत्रण मिळवल्याने भारताला संरक्षण, आर्थिक आणि नैतिक दृष्टीने अनेक लाभ मिळाले, जरी या भागाचे देखभाल अन् संचालन खर्चिक असले तरी. जर सियाचिन पाकिस्तानच्या कह्यात गेला असता, तर त्यांनी लडाखमधील भारतीय लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रडार आणि निरीक्षण केंद्रे उभारली असती. यामुळे चीन आणि पाकिस्तान यांच्यात समन्वय निर्माण होऊन कोणत्याही संघर्षाच्या वेळी संयुक्त आक्रमण करण्याची शक्यता वाढली असती. सियाचिनवरील नियंत्रणामुळे भारतीय लष्कराला नुब्रा खोर्यात संरक्षणात्मक पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता भासली नाही, जे अत्यंत खर्चिक ठरले असते. हा भाग लेहकडे जाणार्या मार्गांचे संरक्षण करतो, जे लडाखचे प्रमुख शहर आणि प्रशासकीय केंद्र आहे.
सियाचिन क्षेत्र काराकोरम खिंडीजवळ आहे, ज्यामार्गे काराकोरम महामार्ग जातो आणि तो पाकव्यवस्थापित काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागाला चीनच्या झिंजियांग प्रांताशी जोडतो. सियाचिन एक प्रकारचा ‘निगराणीचा मनोरा’ (वॉच टॉवर) म्हणून कार्य करतो, ज्यामुळे भारताला पाकिस्तानच्या गिलगिट आणि बाल्टिस्तान भागांवर लक्ष ठेवता येते.
६. ‘ऑपरेशन मेघदूत’ म्हणजे भारतीय सैनिकांच्या अविचल निष्ठेचे आणि जिद्दीचे प्रतीक !
‘ऑपरेशन मेघदूत’ ही एक अशी मोहीम होती, ज्याचे सियाचिन क्षेत्रावर अनेक परिणाम झाले. यामुळे भारताला जम्मू-काश्मीरवर स्वतःची स्थिती मजबूत करण्याची संधी मिळाली आणि पाकिस्तानच्या या प्रदेशावर असलेल्या दाव्याला नैतिक पराभव मानले गेले. असे असले, तरी आजही नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल वातावरण पाकला सियाचिनवर पुनःप्रयत्न करण्यापासून रोखू शकलेले नाही अन् यामुळे भारताला भारतीय सैनिकांची आणि उपकरणांची देखभाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यय करावा लागतो. हा भाग इतका प्रतिकूल आहे की, ‘ऑपरेशन मेघदूत’मध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या अवशेषांचा शोध ३८ वर्षांनी, म्हणजे वर्ष २०२२ मध्ये अनपेक्षितपणे लागला. तथापि गेली ४१ वर्ष भारतीय सैनिकांचा निर्धार अत्यंत मजबूत आहे, जे त्यांच्या सतत उपस्थिती आणि ताब्याच्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यात दिसून येते. हे त्यांच्या अविचल निष्ठेचे आणि जिद्दीचे प्रतीक आहे.
‘ऑपरेशन मेघदूत’चा सारांश सियाचिन बेस कँपवरील एक स्मारक करत दिला जाऊ शकतो, ज्यावर योग्यपणे लिहिले आहे, ‘हिमात कडवटलेले, शांत रहाणारे, जेव्हा तुरुंग वाजेल, तेव्हा ते उठतील आणि पुन्हा चालतील !’ (१२.४.२०२५)
लेखक : श्री. योगेश अशोक चकोर, शिक्षक तथा राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी, भोंसला मिलिटरी स्कूल, नाशिक; तसेच संशोधक विद्यार्थी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.