‘ऑपरेशन मेघदूत’ : भारतीय लष्करी दलांचे अदम्य (अजिंक्य) साहस

१३ एप्रिल या दिवशी ‘ऑपरेशन मेघदूत’ला ४१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने…

(टीप : पाकिस्तानचा सियाचिन परिसरात घुसखोरी करण्याचा डाव उधळणारी भारताच्या तिन्ही लष्करदलांची संयुक्त मोहीम म्हणजे ‘ऑपरेशन मेघदूत’ !)

श्री. योगेश चकोर

भारताच्या लष्करी इतिहासात अनेक धाडसी मोहिमांनी स्वतःचा असा वेगळा एक ठसा उमटवला आहे आणि त्यातील एक महत्त्वपूर्ण मोहीम, म्हणजे ‘ऑपरेशन मेघदूत’. ही मोहीम भारताच्या तिन्ही लष्करी दलांनी विशेषतः भारतीय सैन्य आणि हवाई दल यांनी संयुक्तरित्या राबवलेली एक अत्यंत महत्त्वाची अन् ऐतिहासिक कारवाई होती. ‘ऑपरेशन मेघदूत’ १३ एप्रिल १९८४ या दिवशी चालू करण्यात आले आणि यामध्ये भारताने जगातील सर्वांत उंच रणभूमी असलेल्या सियाचिन हिमनगावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. या मोहिमेने भारताची लष्करी क्षमता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि सैनिकांचे अपार धैर्य यांचा परिचय संपूर्ण जगाला दिला.

‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम, म्हणजे केवळ रणांगणावरील विजय नव्हे, तर ती भारताच्या सैनिकांचे अपार शौर्य, बलीदान आणि राष्ट्रभक्ती यांची साक्ष आहे. सियाचिनच्या बर्फाच्छादित रणभूमीवर भारतीय सैनिक आजही उणे तापमानात जीवघेण्या परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करत आहेत. त्यांच्या या सेवेमुळे आपण सुरक्षित आहोत. म्हणूनच ‘ऑपरेशन मेघदूत’चा अभ्यास करणे, म्हणजे भारताच्या लष्करी इतिहासातील एक प्रेरणादायी पर्व उलगडणे होय.

१. ‘ऑपरेशन मेघदूत’ची आखणी का करण्यात आली ?

सियाचिन हिमनग हा काराकोरम पर्वतरांगेतील एक दुर्गम आणि अत्यंत थंड परिसर आहे. येथे तापमान उणे ५० अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते आणि श्वास घेणेही कठीण असते. १९७० च्या दशकात पाकिस्तानने सियाचिन परिसरात हळूहळू घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू केला होता. त्यांनी या भागात अनेक आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक मोहिमा आयोजित करून स्वतःच्या नियंत्रणाचा आभास निर्माण करण्याचा डाव खेळला. भारताला पाकिस्तानच्या या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने पुढाकार घेऊन या भागावर आधीच ताबा मिळवण्याचा निर्णय घेतला.

‘ऑपरेशन मेघदूत’ची आखणी अत्यंत गुप्ततेने करण्यात आली होती. हिमालयातील अत्यंत प्रतिकूल हवामानातसुद्धा भारतीय सैनिकांनी अवघड चढाई करत हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उपकरणे आणि अन्न पुरवठा करत सियाचिनच्या प्रमुख ठिकाणांवर स्वतःचे तंबू अन् चौक्या उभारल्या. यामुळे पाकिस्तानच्या योजना उधळल्या गेल्या आणि भारताने संपूर्ण सियाचिन ग्लेशियरवर यशस्वीरित्या स्वतःचा ताबा मिळवला.

या मोहिमेचे महत्त्व केवळ लष्करी दृष्टीकोनातूनच नाही, तर धोरणात्मक आणि भौगोलिकदृष्ट्याही पुष्कळ मोठे आहे. सियाचिनचा भूभाग पाक आणि चीन यांच्या सीमेवर असल्याने तो भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. या भागावर नियंत्रण मिळवल्यामुळे भारताने पाकिस्तानच्या संभाव्य आग्रही हालचालींना रोखले आणि स्वतःची भौगोलिक बाजू बळकट केली.

२. सियाचिन प्रदेशचे सामरिक महत्त्व

सियाचिन प्रदेश हा भारतासाठी सामरिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे; कारण हा भाग पाकिस्तानला चीनशी थेट भूसीमारेषा जोडण्यापासून रोखतो. दुसरीकडे पाकसाठी हा भाग थेट प्रवेशद्वारासारखा आहे, ज्यामुळे त्यांना जम्मू-काश्मीरवर दावा करण्यास बळ मिळते. सियाचिनवरील वाद फाळणीच्या वेळी सीमारेषा नीट न ठरल्यामुळे निर्माण झाला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या भागातील वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी अन् शांतता राखण्यासाठी अनेक करार केले. वर्ष १९४९ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशांनी ‘कराची करार’ केला. यानुसार एक ‘युद्धविराम रेषा’ (सीझफायर लाईन) आखली गेली; पण त्यात सियाचिन प्रदेशाचा बराचसा भाग स्पष्टपणे नमूद केला नव्हता. ही युद्धविराम रेषा ‘एन्.जे. ९८४२’ या नकाशातील बिंदूवर संपते. ‘एन्.जे. ९८४२’ हा एक महत्त्वाची भौगोलिक बिंदू (ग्रिड रेफरन्स पॉईंट) आहे, जो भारत-पाकिस्तान ‘नियंत्रण रेषे’च्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा बिंदू जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील भागात सियाचिन ग्लेशियरच्या दक्षिणेकडे आहे. जो चीनच्या सीमेपासून सुमारे ६० किमी दक्षिणेला आहे; कारण हा भाग विशेषतः सियाचिन हिमनदी, अतिशय दुर्गम होता. त्यामुळे तो नकाशावर स्पष्टपणे दाखवण्यात आला नाही. आंतरराष्ट्रीय सीमा अखनूर येथे संपली होती आणि तिथून युद्धविराम रेषा आखण्यात आली होती. (१२.४.२०२५)                            (क्रमशः)

लेखक : श्री. योगेश अशोक चकोर, शिक्षक तथा राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी, भोंसला मिलिटरी स्कूल, नाशिक; तसेच संशोधक विद्यार्थी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.