नुकताच गुढीपाडवा, पाठोपाठ रामनवमी मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरी करण्यात आली. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर गेली अनेक वर्षे गुढीपाडव्यापासून ‘गीत रामायणा’चे प्रसारण करण्यात येते. अनेक ठिकाणी ‘गीत रामायणा’चे कार्यक्रमही आयोजित केले जातात. वर्ष १९५५-५६ मध्ये प्रसारित झालेले गीत रामायण अजूनही नव्याने ऐकले जाते. यातील गीते आणि गीताला असलेले संगीत यामुळे प्रसंग अक्षरश: डोळ्यांसमोर उभा रहातो. त्यांतील प्रत्येक व्यक्ती आपण अनुभवू शकतो. ‘ग.दि. माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या माध्यमातून रामरायानेच त्याचे चरित्र ‘गीत रामायण’ या सुंदर कलाकृतीत बद्ध केले’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. गीत रामायणाचे विविध भाषांत भाषांतरही झाले आहे. ‘गीत रामायण अनेकदा ऐकले आणि त्याचा कंटाळा आला’, असे होणे अशक्यच ! यातून त्याची दिव्यताही लक्षात येते.

गीत रामायणाची निर्मिती होऊन ७-८ दशके लोटली, तरी त्यातील नाविन्य टिकून आहे. एक-एक गीत जेवढे मनापासून आणि अधिक वेळा ऐकू, तेवढा त्यातील अर्थ अधिक उमजू लागतो. ग.दि. माडगुळकर यांनी प्रत्येकच ठिकाणी घेतलेला योग्य शब्द पाहून क्षणभर मन तेथेच थांबते. प्रत्येकाने हा अनुभव नक्कीच घेतला असेल. सात्त्विकतेचे आयुष्य अधिक असते. त्यामुळे ‘गीत रामायण’ अजूनही सर्वांना प्रिय आहे आणि भविष्यातही राहील. गीत रामायणात कुठेच मानसिक आणि भावनिक स्तर आपल्याला दिसणार नाही. प्रत्येक प्रसंगावर असलेल्या गीतातील शब्द आणि त्याला असलेले संगीत हे आध्यात्मिक स्तरावर आहे. गीत रामायणाचा आत्मा साक्षात् रामकथा आहे आणि त्यामुळेच एवढी वर्षे होऊनही ते ऐकावेसे वाटते.
आपण क्षणभर विचार करूया की, आता ऐकतांना पुष्कळ सहज, सोपे वाटत असले, तरी ‘गीत रामायण’ हे कलियुगातील एक शिवधनुष्यच होते. रज-तम वातावरणात भूतलावर देवलोकीचे क्षण अनुभवता येण्यासारखी रचना होणे, हे खरेच दैवी आहे. जर आताच्या शतकातील ‘गीत रामायण’ एवढे दैवी असेल, तर प्रत्यक्ष रामायणाचा स्तर काय असेल ? रामायणाची महती आणि वर्णन शब्दबद्ध करण्यास सामान्य माणसाची बुद्धी आणि वाणी असमर्थ आहे, तो स्तर कल्पनेच्या पलीकडीलच म्हणावा लागेल.
या माध्यमातून एक आवाहन करावेसे वाटते की, लहान-थोर सर्वांनीच आपले प्राचीन धर्मग्रंथ, काव्य, महाकाव्य, वाङ्मय यांचा अभ्यास करावा, एकमेकांशी याविषयी चर्चा करावी आणि हिंदु धर्म अधिकाधिक जाणून घ्यावा. अजरामर कलाकृती असलेल्या गीत रामायणाच्या श्रवणातून भावभक्ती वाढवून आपलेही जीवन कृतार्थ करून घ्यावे. यासाठी आपण सर्वांनीच प्रभु श्रीरामांना शरण जाऊया.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी