
‘येथे ‘मलीन चित्त आणि अमलीन शुद्ध चित्त’, यांतील भेद स्पष्ट केला आहे. चित्त अशुद्ध असणारा त्याग करतो आणि ‘मी त्याग केला’, असे मानतो. त्याचा ‘मी’ जागा असतो. तो ‘मी त्याग केला’, अशी धारणा करून घेतो.
‘नैव कुर्वन्न कारयन् ।’ (श्रीमद्गवद्गीता, अध्याय ५, श्लोक १३) म्हणजे ‘जो निरहंकारी असतो, त्यालाच काहीही न करता आणि काही न करविता’, शुद्ध अंतःकरण, म्हणजे निरहंकारता हे साधते. हे अहंकार्याला कधीच साधत नाही. जो निरहंकारी असतो, तो ‘देह आणि इंद्रिये माझी आहेत’, असे मानतच नाही. तो शरिराहून स्वतःला वेगळा मानतो. साक्षी मानतो. तो कर्म करतो आणि ‘मी काही करत नाही. भगवानच सगळे करतो’, अशी त्याची सतत धारणा असते. येता-जाता, निजता, उठता, ग्रास (घास) गिळता तो सतत भगवंतातच असतो. ‘निजणे, उठणे, येणे-जाणे, खाणे, पिणे, हे सगळे भगवानच करतो’, ही त्याची पक्की धारणा असते. निमिषभरही (क्षणभरही) तो त्या धारणेतून चळत नाही; म्हणून शांती त्याला अंतरत नाही. विश्रांतीसुख दुरावत नाही.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०२३)