कीर्तनाचे महत्त्व

प.पू. स्वामी वरदानंद भारती

परमेश्वरविषयक भक्ती अंतःकरणात वाढावी आणि सर्व जीवनसंसार शांतीसुखाचा व्हावा; म्हणून ईशसेवेचे जे स्मरणादि ९ प्रकार सांगितले आहेत, त्यात ‘कीर्तन’ हा एक विशेष महत्त्वाचा प्रकार आहे. महत्त्वाचा अशासाठी म्हणायचे की, इतर मार्ग केवळ व्यक्तीनिष्ठ आचरणार्‍या त्या त्या व्यक्तीपुरते मर्यादित असे आहेत, त्यांना समाजोन्मुखता विशेष नाही. ती साधने वा ते मार्ग लोकसंग्रहाकरता वापरता येणार नाहीत. त्यांच्या अस्तित्वामुळे समाजाचे कल्याण होते, यात जरी शंका नाही, तरी त्यांच्यामुळे प्रत्यक्ष प्रेरणा मिळत नाही, हे विसरता येत नाही. कीर्तनामुळे ती मिळते; म्हणूनच आपण ‘तरोनि जन तारी । ते  ज्ञानाची अगाध थोरी ।’, या न्यायाने कीर्तन अधिक महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. भगवान श्रीवेदव्यासांसारख्या अत्यंत श्रेष्ठ अशा पुरुषोत्तमालाही समाधान मिळवण्याचा मार्ग उपदेशिणार्‍या श्री नारदमहर्षींनी ही कीर्तनाची गादी स्थापिली आहे. यातून कीर्तनाचे विशेष महत्त्व लक्षात येणारे आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(दे.ल. महाजन यांच्या ‘अख्यान रत्नमाला’ या  ग्रंथाच्या प्रस्तावनेतून साभार)