
देव तुमच्या पाठीशी आहे, तो कृपाळूपणे तुमच्यातील धारिष्ट्य पहात आहे, सूडबुद्धीने अंत पहात नाही ! त्याचे कृपाळूपण आपल्याला कळत नाही इतकेच. जसे सामान्यत: मूल चालायला लागले की, ते प्रारंभी बर्याचदा पडते. ते पडू नये म्हणून आईने त्याला वेगळे चालूच दिले नाही तर…? याखेरीज मूल पडले, तर आई लगेचच धावत नाही. ते आपले आपण उभे रहाते कि नाही ? याची थोडी वाट पहाते. तसे जर तिने केले नाही, तर पोर कायमचे पांगळे राहील; म्हणून शहाणी आई मूल पडले, तरी जरा थांबते, ते लेकराच्या हितासाठीच ना !
हे कृपाळूपण आहे कि नाही? हे पटत आहे ना ? पण ते लेकराला कळते का ? लेकरू शरिराने लहान तसे बुद्धीनेही लहान आहे. आपणही शरिराने मोठे झालो; पण बुद्धीने मोठे झालो नाही; म्हणून देवाचे कृपाळूपण आपल्या लक्षात येत नाही. म्हणून ‘संतांच्या संगतीत मी काय शिकलो ?’, असे गुरु श्रीनानकांना जेव्हा विचारले, तेव्हा ते सांगतात, ‘जो प्रभु कियो सो भल मानो । यही सुमति साधू से पायो ।’ याचाच अर्थ ‘परमेश्वर करील ते चांगलेच करील, चांगल्याकरताच करील, हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करायला मी संतांच्या संगतीत शिकलो.’
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘श्रीवरदगीताप्रदीप’ ग्रंथातून)