उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रसारमाध्यमांना कानपिचक्या

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे थेट तक्रार करतील, असे वाटत नाही. त्यांना काही सांगायचे असल्यास ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मला सांगतील. तेवढे आमचे संबंध चांगले आहेत. सूत्रांच्या सांगण्यावरून माहिती देणे बंद करा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना कानपिचक्या दिल्या. निधी वाटपात शिवसेनेच्या मंत्र्यांना वाट पहावी लागत असल्याची वृत्ते काही माध्यमांनी प्रसारित केली होती. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी वरील उत्तर दिले.
रायगडच्या पालकमंत्री पदाविषयी अद्याप निर्णय झालेला नसल्याचे अजित पवार यांनी या वेळी सांगितले. रायगडावरील अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले की, मला भाषण करण्यास सांगण्यात आले होते; मात्र दुपारी २ वाजून गेले होते. विलंब झाल्यामुळे मीच स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना माझ्याऐवजी त्यांना बोलण्यास सांगितले.