तरुणांच्या त्रासाला कंटाळून बारामती (पुणे) येथे शाळकरी मुलीची आत्महत्या !

(प्रतिकात्मक चित्र)

बारामती (जिल्हा पुणे) – लग्न करण्यासाठी आई-वडिलांना मारण्याची धमकी दिल्याने कोर्‍हाळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. याविषयी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात विशाल गावडे, प्रवीण गावडे, शुभम गावडे, सुनील खोमणे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १५ वर्षीय मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी स्वत:च्या साथीदारांसह गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. ‘मेसेज’वर घरच्यांना मारण्याची धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटी यांना मुलगी कंटाळली होती. त्यामुळे तिने रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

संपादकीय भूमिका :

  • मुलींनो, तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आत्मसंरक्षणाचा मार्ग स्वीकारणे श्रेयस्कर !
  • छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुली-महिला यांना छेडछाड करणार्‍यांचा त्रास असह्य होऊन आत्महत्या करावी लागते, हे पोलिसांना लज्जास्पद !