सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना आध्यात्मिक पातळीनुसार प्रारब्ध कर्म, क्रियमाण कर्म आणि संचित कर्म यांचे प्रमाण यांविषयी मिळालेले सूक्ष्म ज्ञान येथे दिले आहे.

टीप १ – संचित कर्म : हे कर्म जिवाच्या आतापर्यंतच्या विविध जन्मांतील चांगल्या आणि वाईट अशा सर्व कर्मांचे गाठोडे असते. जेव्हा साधना करणार्या जिवाचा मनुष्य जन्म शेवटचा असतो, तेव्हा त्याचे प्रथम प्रारब्धकर्म भोगून संपते आणि त्यानंतर त्याचे संचित कर्म भोगून संपू लागते.
उदाहरण
भक्त सुदामा हा अत्यंत दरिद्री होता; तरीही तो कठोर धर्माचरण करून भिक्षेवर उदरनिर्वाह करत होता. त्याला ठाऊक होते की, तो त्याचे संचित कर्म भोगत आहे. त्यामुळे त्याला कितीही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, तरीही त्याने त्याचा धर्म कधीच सोडला नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याचे पोहे ग्रहण करून त्याचे संपूर्ण संचित कर्म संपवले आणि त्याला धनवान केले.
टीप २ – प्रारब्ध कर्म : सर्वसामान्य जिवाला एका जन्मात संचित कर्मातील काही अंश भोगावा लागतो. यालाच ‘प्रारब्ध कर्म’ म्हणतात. सर्वसामान्य मनुष्याला केवळ प्रारब्ध कर्मच भोगावे लागते.
उदाहरण
श्रीजगन्नाथाचा भक्त माधवदासाचे १ मासाचे आजारपणाचे प्रारब्ध भोग भोगणे शिल्लक होते. त्यामुळे श्रीजगन्नाथदेव त्याला प्रारब्ध भोग भोगण्यासाठी शक्ती देत होता. तरीही त्याला ते भोगणे सहन न झाल्यावर उर्वरित १५ दिवसांचे प्रारब्ध श्रीजगन्नाथाने स्वतःवर घेऊन ते भोगले. त्यामुळे आजही श्रीजगन्नाथपुरीमध्ये वर्षातील १५ दिवस मंदिराचे दार बंद असते.
टीप ३ – क्रियमाण कर्म : स्वतःची बुद्धी वापरून नवीन कर्म करणे म्हणजे ‘क्रियमाण कर्म’ करणे होय. ज्यांचे प्रारब्धकर्म तीव्र असते, त्यांचे क्रियमाण कर्म अल्प असते. याउलट आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांचे प्रारब्धकर्म भोगून संपल्यावर संचित कर्म भोगणे चालू असतांना त्यांच्या साधनेमुळे त्यांच्या क्रियमाण कर्माचे प्रमाणही सामान्य मनुष्याच्या तुलनेत वाढत जाते. याच क्रियमाण कर्माच्या बळावर सात्त्विक जीव अधिकाधिक साधना करून आध्यात्मिक उन्नती करून घेतो आणि संचित कर्मही भोगून संपल्यामुळे त्याला ईश्वरप्राप्ती, म्हणजे मोक्ष मिळतो.
उदाहरणे
अ. भक्त प्रल्हाद : भक्त प्रल्हादाचे संचित कर्म कठीण असल्यामुळे त्याच्यावर त्याच्या पित्याच्या आज्ञेने एकामागोमाग एक असे संचित प्रारब्धरूपी मृत्यूयोग ओढवत होते. तरीही भक्त प्रल्हाद डगमगला नाही आणि त्याने प्रत्येक वेळी भगवंताचे श्रद्धेने आणि भक्तीने स्मरण करून संचित प्रारब्धावर मात केली.
आ. मार्कंण्डेयऋषि : त्याचप्रमाणे मार्कंण्डेयही अल्पायुषी होता; परंतु त्याने शेवटच्या क्षणापर्यंत भक्तीभावाने शिवाची आराधना करून त्याचे कृपाशीर्वाद मिळवले. त्यामुळे मार्कंण्डेयचा अकाल मृत्यूयोग टळून तो सप्त कल्पांतापर्यंत जिवंत राहिला. येथे भक्त प्रल्हाद आणि मार्कंण्डेयऋषि या दोघांनीही क्रियमाण कर्माचा योग्य वापर करून संचित कर्मावर विजय प्राप्त केला.
इ. कर्ण : त्याचप्रमाणे महाभारत युद्धाच्या वेळी जेव्हा कर्णाला समजले की, तो ज्येष्ठ कुंतीपुत्र आहे, तरीही त्याने त्याच्या क्रियमाण कर्माचा अयोग्य वापर करून दुर्याेधनरूपी अधर्माचा पक्ष घेतला.
ई. युयुत्सू : याउलट महाभारत युद्धाचा आरंभ होण्यापूर्वी ‘युयुत्सू’ या कौरवाने कौरवांच्या अधर्मी पक्षाचा त्याग करून पांडवांचा, म्हणजे धर्माच्या पक्षाने लढण्याचा निर्णय घेऊन योग्य क्रियमाण कर्म वापरले.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले, सनातन आश्रम, गोवा. (१५.१०.२०२४)
|