‘सर्वसाधारणपणे मुले जन्माला आल्यावर रडतात; पण काही मुले जन्मतःच हसरी असतात’, याचे आध्यात्मिक विश्लेषण !

‘मुले जन्माला आल्यावर बहुतेक वेळा रडतात आणि काही मुले जन्मतःच हसरी हसतात. यांची आध्यात्मिक कारणे कोणती ?’, यासंदर्भात देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

श्री. राम होनप

१. ‘जन्माला आल्यावर मुले का रडतात ?’, 

याची संकेतस्थळावर दिलेली कारणे

अ. ‘बाळाला भूक लागणे

आ. बाळाला थंडी वाजत असणे किंवा गरम होत असणे

इ. बाळाला डायपरमध्ये (टीप) लघवी किंवा शौच झाल्यामुळे थंडी वाजणे

टीप – डायपर : मल-मूत्र शोषून घेण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र.

ई. मोठा आवाज आणि गोंगाट सहन न होणे

उ. शरिराला खाज येणे

ऊ. बाळाला त्याचे कपडे किंवा अंथरूण टोचणे

ए. अंगदुखी

ऐ. पोटाचे त्रास इत्यादी.’

(सौजन्य : संकेतस्थळ – https://youtu.be/3CpLQ-13Vsw?si=ABkTUC6Iw5p_tT6O)

२. वरील विषयाच्या संदर्भात सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान 

२ अ. आईच्या गर्भात असतांना बाळाची स्थिती

२ अ १. परावलंबी : गर्भात असतांना बाळ आईवर पूर्णतः अवलंबून असते. आईकडून गर्भातील बाळाला अन्न आणि पाणी मिळत असते. त्यामुळे त्या बाळाला ‘परावलंबी’, असे म्हटले आहे.

२ अ २. निश्चिंतता : आईच्या गर्भात असतांना बाळाला स्वतःला काहीच करायचे नसते. त्याचे संपूर्ण जीवन आईवर अवलंबून असते. त्याला ‘मातृ-भृति अवस्था’, असे म्हणतात. भृति, म्हणजे ‘अवलंबून असणे.’ आईच्या गर्भात बाळाचे जीवन निश्चिंत असते.

२ अ ३. गाढ निद्रा : आईच्या गर्भात असतांना बाळ गाढ निद्रेत असते.

२ आ. जेव्हा बाळाचा जन्म होतो, तेव्हा त्याचे स्वतःचे जीवन चालू होते.

२ इ. बाळ रडण्यामागील कारणे

२ इ १. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर बाळाला असुरक्षित आणि असाहाय्य वाटू लागते. त्या भावनेतून त्याला रडू येते.

२ इ १ अ. बाळाचे रडण्याचे प्रमाण हळूहळू न्यून होण्यामागील कारण : जन्म झाल्यानंतर बाळाचा हळूहळू सर्वांगीण विकास होऊ लागतो. बाळाला अधूनमधून त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे आई-वडील आणि कुटुंबीय दिसू लागतात. बाळ आरंभी कुणाला ओळखत नाही; परंतु कुटुंबियांचे चेहरे अधूनमधून पाहिल्याने ‘माझ्या समवेत कुणीतरी आहे’, अशी सूक्ष्म जाणीव त्याला होऊ लागते.

त्यातून त्याची असाहाय्यतेची भावना न्यून होऊ लागते. जसजशी बाळाची ‘मी एकटा नसून मला पहाणारे किंवा सांभाळणारे कुणीतरी आहे’, ही जाणीव वृद्धींगत होऊ लागते, तसतसे त्याचे रडण्याचे प्रमाण न्यून होऊ लागते.

२ इ २. बाळावर अनिष्ट शक्तींची सूक्ष्मातून आक्रमणे होणे : नवजात बाळाला कधी कधी अनिष्ट शक्ती भीती दाखवतात. त्या वेळी सूक्ष्मातून अनिष्ट शक्ती त्या बाळाकडे अत्यंत क्रोधाने पहातात. त्या अनिष्ट शक्तीचे डोळे आणि तोंड यांतून रक्त वहात असते. हे दृश्य पाहून बाळ पुष्कळ वेळा रडतांना दिसते.

३. बाळ जन्मतःच हसरे असण्यामागील आध्यात्मिक कारणे

३ अ. आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असणे : आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर काही मुले रडत नाहीत, तर ती हसरी असतात. त्यांपैकी काही जीव आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असू शकतात. अशा जिवांना ‘नारायण-भृति’, असे म्हणतात. याचा अर्थ ती मुले नारायणावर, म्हणजे भगवंतावर अवलंबून असतात.

हे मूल हृदयातील ईश्वरी आनंद अनुभवत असते. ते अन्य कुणावर अवलंबून नसते. त्यामुळे ते रडण्याऐवजी हसतांना दिसते. (‘जेव्हा माझी आई ((कै.) पू. (सौ.) निर्मला होनप (सनातनच्या २९ व्या संत)) जन्माला आली, तेव्हा ती हसत होती.’ – श्री. राम)

३ आ. कनिष्ठ देवतांचे दर्शन होणे : ज्या ठिकाणी मूल जन्माला येते, त्या ठिकाणी असलेल्या काही कनिष्ठ देवता त्यांच्या क्षेत्रातील नवीन जन्माला आलेल्या मुलांचे रक्षण करतात. त्यासाठी त्या मुलाच्या अवतीभोवती सूक्ष्मातून संचार करत असतात. या देवता दिसायला सुंदर आणि प्रसन्न असतात. त्यांना पाहून त्या मुलालाही प्रसन्नता वाटते. त्यामुळे मूल त्या देवतेकडे पाहून अकस्मात् हसते.

३ इ. स्वर्गलोकातील अप्सरांचे दर्शन होणे : स्वर्गलोकातील काही अप्सरा या मातृभावात असतात. त्यांना पृथ्वीवर नवजात मुलाला भेटण्याची इच्छा झाल्यास त्या काही वेळासाठी पृथ्वीवर येतात. त्या मुलाला अप्सरेचे सूक्ष्म रूपात दर्शन होते. जी अप्सरा मोहक, प्रसन्न आणि सुंदर असते. त्या अप्सरेला ते मूल हास्याद्वारे प्रतिसाद देते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१२.२०२४)