Indo- Bangla Trade Closed : भारताच्या भूमीचा वापर करून होणारा बांगलादेशाचा व्यापार केला बंद !

भारताने बांगलादेशाला शिकवला धडा !


नवी देहली – भारतातील ईशान्येकडील राज्ये भूमीने घेरली असून आम्हाला समुद्रामार्गे पोचता येते; म्हणून चीनने बांगलादेशासमवेत व्यापार वाढवावा, असे चीनमध्ये जाऊन आवाहन करणारे बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे सल्लागार महंमद युनूस यांना भारताने धडा शिकवला आहे. बांगलादेश नेपाळ, भूतान आणि मान्यमार या देशांशी भारताच्या भूमीचा वापर करून करत असलेल्या व्यापारावर आता भारताने बंदी घातली आहे. यामुळे बांगलादेशाची आयात आणि निर्यात दोन्ही बंद होणार आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने ८ एप्रिल या दिवशी याविषयीची एक अधिसूचना प्रसारित केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, बांगलादेशाला निर्यात कार्गोसाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद करण्यात आली आहे. या संदर्भातील २९ जून २०२० ची अधिसूचना रहित केली आहे. या अधिसूचनेद्वारे बांगलादेशाला भारतीय सीमेतून तिसर्‍या देशात निर्यात करण्याची अनुमती देण्यात येत होती.

आतापर्यंत बांगलादेशाचा निर्यात माल कंटेनर किंवा बंद ट्रकमध्ये तिसर्‍या देशाच्या बंदरांवर नेला जात असे आणि हे कंटेनर किंवा ट्रक भारतीय भूमीवरून, म्हणजेच भारतीय भूमी सीमाशुल्क स्टेशन मार्गाने अन्य देशांमध्ये नेले जात होते. या सुविधेद्वारे तो भूतान, नेपाळ आणि म्यानमारमध्ये सहजपणे निर्यात करू शकत होता.

संपादकीय भूमिका

जर भारताला हे शक्य होते, तर आधीच का केले नाही ? अशा प्रकारेच भारत बांगलादेशाच्या नाड्या का आवळत नाही ?