‘शरिराला खाज येणे, म्हणजे त्वचेची होणारी एक अस्वस्थता होय. त्यामुळे आपल्याला तेथे खाजवण्याची इच्छा होते. खाज वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकते. खाज येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय पुढे दिले आहेत.
१. खाज येण्याची कारणे
१ अ. पित्त : बर्याचदा आपल्याला पित्तामुळे खाज येत असते. जेव्हा आपल्या रक्तात पित्ताची मात्रा वाढते, तेव्हा आपल्या शरिराला अकस्मात् खाज येते.
१ आ. त्वचारोग :
१. ‘एक्झिमा’ (हा एक असा रोग आहे की, ज्यामध्ये त्वचेला तीव्र खाज सुटते आणि त्वचा कोरडी होते.)
२. ‘सोरायसिस’ (‘सोरायसिस’ हा तीव्र दाहक, दीर्घकाळ बरा न होणारा आणि संसर्गजन्य नसलेला त्वचारोग आहे.)
१ इ. ‘ॲलर्जी’ : आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती अतिसंवेदनशील होण्याची एक अवस्था, म्हणजे ‘ॲलर्जी’. एखाद्या औषधाची ‘ॲलर्जी’ म्हणूनही त्वचेला खाज येऊ शकते.
१ ई. डास, मच्छर किंवा एखादा कीटक चावणे
१ उ. फंगस (बुरशी) किंवा बॅक्टेरिया (जीवाणू)
१ ऊ. मानसिक ताणतणाव
१ ए. त्वचा शुष्क असणे
१ ऐ. पुष्कळ गरम पाण्याने अंघोळ करणे
२. उपाय
२ अ. आमसुलाचे पाणी प्यावे आणि ते हात अन् पाय यांना लावावे. त्यामुळे खाज येणे लगेच न्यून होते.
२ आ. आवळा आणि सुंठ यांच्या चूर्णाचे मिश्रण पाण्यासह घेणे : ५० ग्रॅम आवळा चूर्णात (अल्पाहाराचा पदार्थ खाण्याचे ७ चमचे) चहाचा पाव चमचा (किंवा ४ ते ५ चिमूट) सुंठीचे चूर्ण घालून ते एकत्र करून ठेवावे. हे चहाचा १ चमचा (साधारण ५ ग्रॅम) मिश्रण १ पेला (२०० मि.लि.) पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. ते पाणी सकाळी चमच्याने ढवळावे (हलवावे) आणि गाळून घेऊन उपाशीपोटी प्यावे. हा उपाय २१ दिवस करावा.

२ इ. शरीरशुद्धी करणे : त्वचेचे रोग बरे होण्यासाठी शरीरशुद्धी करणे आवश्यक असते. त्यासाठी चहाचा एक चमचा (साधारण ५ ग्रॅम) त्रिफळा चूर्ण आणि अल्पाहाराचा पदार्थ खाण्याचा १ चमचा तूप प्रतिदिन रात्री झोपतांना अन् सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यासह घ्यावे. हे चालू केल्यानंतर दुसर्या दिवसापासून २ दिवस लंघन (केवळ द्रवपदार्थ घेणे) करावे. यात आपण ताक, दूध, मुगाचे पाणी किंवा साधे पाणीही पिऊ शकतो. पुढचे २ दिवस दोन्ही वेळा, म्हणजे सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता मुगाची खिचडी अन् नंतर पुढचे ३ दिवस वरील दोन्ही वेळा भाजी-भाकरी खाऊ शकतो. असे एकूण ७ दिवस करावे. ही प्रक्रिया प्रत्येक मासाच्या आरंभी करावी. असे ३ – ४ मास करावे. त्रिफळा चूर्णाचे प्रमाण पहिल्या मासात १ चमचा, दुसर्या मासात पाऊण चमचा, तिसर्या मासात अर्धा चमचा आणि चौथ्या मासात पाव चमचा, असे न्यून करत जावे अन् नंतर ते घेणे बंद करावे.
२ ई. शरिराला अपाय करणारे पदार्थ खाणे टाळणे : ‘आपल्या शरिराला कोणत्या पदार्थांची ॲलर्जी आहे ?’, हे शोधून ते पदार्थ खाण्याचे टाळावे किंवा त्वचेला क्रीम इत्यादी लावत असल्यास ते टाळावे. औषधांतील घटकांची ॲलर्जी असल्यास आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांना तसे अगोदरच सांगावे, म्हणजे व्याधीवर औषध देतांना ते काळजी घेतील.
२ उ. डास किंवा कीटक यांच्यापासून रक्षण होण्यासाठी मच्छरदाणीचा उपयाेग करावा.
२ ऊ. योग्य औषधोपचार करणे : फंगस (बुरशी) किंवा बॅक्टेरिया (जीवाणू) यांमुळे येणार्या खाजेवर योग्य औषधोपचार करावा. जर त्या जागी मलम लावले, तर तो भाग १५ – २० मिनिटे उघडा ठेवून पंख्याखाली बसावे. तो भाग अधिकाधिक हवेशीर ठेवावा. त्यामुळे फंगससारखे त्वचेचे आजार लवकर बरे होतात.
२ ए. मानसिक ताणतणाव दूर होण्यासाठी ‘नामजप, ध्यान आणि प्राणायाम’, यांसारखे उपाय करावेत अन् मन शांत ठेवावे.
२ ऐ. साबण न वापरता उटणे किंवा डाळीचे पीठ वापरणे : अंघोळीच्या १० – १५ मिनिटे आधी पूर्ण अंगाला तिळाचे किंवा खोबरेल तेल चोळावे. अंघोळीच्या वेळी शक्यतो साबण न वापरता २ चमचे उटणे किंवा डाळीचे पीठ घेऊन त्यात ४ – ५ थेंब खोबर्याचे तेल घालून ते वापरावे.
२ ओ. पुष्कळ गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे; कारण गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी होऊन शरिराला खाज येते.’
– डॉ. दीपक जोशी, निसर्गाेपचार तज्ञ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स), देवद, पनवेल. (१८.२.२०२५)