भविष्यात ‘गजवा-ए-हिंद’ झाल्यास मराठी लोकांना कोण वाचवणार ? – सुनील शुक्ला यांचा राज ठाकरे यांना प्रश्न

राज ठाकरे

मुंबई – भाषेचा आम्ही आदर करतो; पण भाषेच्या नावाखाली तुम्ही कुणाला मारू शकत नाही. तुम्ही हिंदूंना मारून सर्वांत मोठा गुन्हा करत आहात. महाराष्ट्रात कुठेही ‘गजवा-ए-हिंद’ (भारताच्या इस्लामीकरणासाठी पुकारलेले युद्ध) झाले, तर मराठी लोकांना वाचवण्यासाठी माझा उत्तर भारतीय उभा रहायला हवा कि नको ? असा प्रश्न अशी टीका उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केली. तुम्ही पंक्चरवाला, चावी बनवणार्‍यांना, मटण-चिकन दुकानदारांना मारत नाहीत, जे १०० टक्के मुसलमान आहेत; मात्र तुम्ही उत्तर भारतीय जो ब्राह्मण, क्षत्रिय असेल, त्यांना मारहाण करत आहात. याद्वारे तुम्ही हिंदूंमध्ये फूट पाडत आहात, असा आरोपही त्यांनी केला.

श्री. सुनील शुक्ला म्हणाले की,

१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल या संघटनेत ९० टक्के कार्यकर्ते हे उत्तर भारतीय आहेत, याचा आम्हाला गर्व आहे. त्यांचे वडील, काका, मोठे भाऊ, आजोबा कर्तव्यावर आहेत, ते तिथे ‘सिक्युरिटी गार्ड’ म्हणून काम करतात. त्यांच्या कानशिलात तुम्ही मारत आहात.

२. उद्या तुम्हाला या लोकांनी साहाय्य केले पाहिजे. हे कसले राजकारण ? तुम्ही उत्तर भारतीय आणि मराठी माणसांचे विभाजन करत आहात. आम्ही तुमचा विरोध करतो.

३. सर्वाेच्च न्यायालयातून तुमच्या विरोधात आदेश आणणारच आहे. सनातनी हिंदु पक्ष म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित करून तुमच्या विरोधात उभे करू !

४. तुम्ही राज्यघटनेचे उल्लंघन करत आहात. तुम्ही हिंदुविरोधी आहात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अवमान तुम्ही करत आहात. मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा नाही. तुम्ही केवळ उत्तर भारतीय नव्हे, तर मराठी लोकांचेही विरोधक आहात.


मनसेची मान्यता रहित करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

उत्तर भारतियांविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आरोप

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात उत्तर भारतीय विकास सेना राजकीय पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याचिका प्रविष्ट केली आहे. राज ठाकरे यांच्यावर उत्तर भारतियांविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आणि महाराष्ट्रात हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या द्वेषपूर्ण भाषणाविषयी महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यास सांगावे, तसेच निवडणूक आयोगाला मनसेची मान्यता रहित करण्याचे न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.