समाजप्रबोधन करणे आणि प्रेरणा देणे यांसाठी वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची ! – दत्तात्रय होसबाळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

विवेक प्रकाशनच्या ‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथांचे प्रकाशन

‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथांचे प्रकाशन करतांना मध्यमागी श्री. दत्तात्रय होसबाळे आणि अन्य मान्यवर

मुंबई – सध्या वृत्तपत्र चालवणे हा व्यवसाय झाला आहे. काळानुसार पालट होणे स्वभाविक आहे; परंतु व्यावसायिकता असली, तरी वृत्तपत्रांनी कर्तव्य विसरता कामा नये. साप्ताहिक ‘विवेक’ कर्तव्यभावनेने उद्दिष्ट ठेवून चालवण्यात येत आहे. समाजप्रबोधन, समाजजागृती, समाजाला प्रेरणा देणे, संवेदनशीलता जपणे, तसेच कर्तव्याची जाणीव करून देणे यांसाठी वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. दत्तात्रय होसबाळे यांनी केले. विवेक प्रकाशनाच्या ‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

चैत्र शुक्ल दशमीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच ७ एप्रिल या दिवशी वडाळा उद्योग भवनातील ‘निको हॉल’मध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी व्यासपिठावर हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश पतंगे, ‘साप्ताहिक विवेक’चे कार्यकारी प्रमुख श्री. राहुल पाठारे, साप्ताहिक ‘विवेक’च्या पुस्तक विभागाचे संपादक श्री. रवींद्र गोळे हे उपस्थित होते. या वेळी साप्ताहिक ‘विवेक’च्या डिजिटल ग्राहक नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

या वेळी श्री. दत्तात्रय होसबाळे म्हणाले, ‘‘समाजाला जागृत करण्याच्या कार्यात ‘विवेक’चे योगदान अतुलनीय आहे. चांगले कार्य समाजापुढे आणण्याचा प्रयत्न पत्रकारितेच्या माध्यमातून व्हायला हवा. यातून कुणाला कोणती प्रेरणा मिळेल, हे सांगता येत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ संस्था नाही, तर एक आंदोलन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार या भूमीचे म्हणजे राष्ट्रीयत्वाचे विचार आहेत. ‘समाजाचे परिवर्तन’ हा संघटनेचा केंद्रबिंदू असायला हवा. प्रत्येक व्यक्ती संघाच्या शाखेत येईल, असे नाही आणि प्रत्येक कार्य संघच करील, असेही नाही. विविध संघटनेच्या माध्यमातून हे कार्य होत आहे. अशा संघटनांचे संघटन करायला हवे. राष्ट्राची उन्नती महत्त्वाची आहे. ही भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे.’’

या वेळी श्री. रवींद्र गोळे यांनी ‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथाचे वैशिष्ट्य विशद केले. या ग्रंथामध्ये ८० लेख समाविष्ट असल्याचे गोळे यांनी सांगितले.