पुणे येथील ‘गोखले राज्यशास्त्र संस्थे’तील १ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी नियमबाह्य वळवला !

‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया’चे सचिव मिलिंद देशमुख यांना अटक

पुणे – येथील ‘गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थे’तील १ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळवल्याच्या आरोपावरून ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया’चे सचिव मिलिंद देशमुख यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिलिंद देशमुख यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिली. या प्रकरणी डॉ. विशाल गायकवाड यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.

१. गोखले राज्यशास्त्र संस्था ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया’च्या अधीन आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार शैक्षणिक संस्थेतील निधी अन्य खात्यांत वर्ग करणे नियमबाह्य आहे.

२. देशमुख यांनी १३ डिसेंबर २०२२ या दिवशी नागपूर येथील‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया’ची भूमी ‘फ्री होल्ड’ (रिकामी) करण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली होती. सदरची रक्कम संस्थेतील कोणत्याही सदस्यांची अनुमती न घेता, ठराव न करता दिली.

३. २४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी या रकमेतील १ कोटी २ लाख रुपये नागपूर जिल्हाधिकार्‍यांच्या खात्यावर, ४० लाख रुपये धनादेशाद्वारे सोसायटीच्या खात्यावर पाठवण्यात आले.

४. या रकमेचा उपयोग जुनी कागदपत्रे मिळवणे, मुद्रांक शुल्क, सल्लागार शुल्क, प्रशासकीय व्यय या कारणांसाठी दाखवण्यात आला. या व्ययाचा तपशिल संशयास्पद आहे. मिलिंद देशमुख आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संस्थेची फसवणूक करून स्वत:च्या लाभासाठी निधीचा अपहार केल्याचा आरोप डॉ. विशाल गायकवाड यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका :

  • एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कसा काय वळवला जातो ?
  • यामध्ये संबंधित असणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !