
‘२२.२.२०२५ या दिवशी मी जामखेड (जिल्हा अहिल्यानगर) येथील साधिका सौ. पल्लवी उमेश माळवदकर यांच्या घरी एका सेवेनिमित्त गेलो होतो. त्यांच्या कुटुंबियांशी बोलत असतांना मला माझ्या बाजूच्या खोलीत सूक्ष्मातून श्री भवानीदेवीचा चांदीच्या रंगाचा एक मुखवटा काही क्षण दिसला. त्यानंतर काही सेकंदांनी पुन्हा असेच दृश्य दिसले. असे एकूण ३ वेळा झाले. तेव्हा मला जाणवले, ‘या घराचा श्री भवानीदेवीशी काहीतरी संबंध आहे.’
मी पल्लवीताईंना विचारले, ‘‘तुमची कुलदेवी कोणती ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘भवानीदेवी.’’ त्या वेळी मी त्यांना म्हणालो, ‘‘या घरात श्री भवानीदेवीचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत आहे.’’ तेव्हा पल्लवीताई म्हणाल्या, ‘‘माझ्या यजमानांच्या आजींकडे श्री भवानीदेवीची परडी (टीप) होती. ही परडी देवघराजवळ ठेवली आहे.’’

(टीप – ज्यांच्याकडे परडी असते, त्यांनी मंगळवार आणि शुक्रवार या वारी, म्हणजे देवीच्या वारी पाच घरी जाऊन जोगवा मागायचा असतो. जोगव्यामध्ये ज्वारीचे पीठ किंवा धान्य दिले जाते. जोगवा मागतांना त्या स्त्रीने गळ्यात कवड्यांची माळ घातलेली असते.)
तेव्हा माझ्या मनात विचार आले, ‘या घरात परंपरेनुसार श्री भवानीदेवीची उपासना चालू आहे. त्यामुळे त्यांच्या घरात श्री भवानीदेवीचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवत आहे. घरात कुणी मनोभावे देवाची उपासना करत असल्यास त्याचा अल्प-अधिक लाभ पूर्ण कुटुंबाला होत असतो’, हे वरील उदाहरणातून शिकायला मिळाले.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.३.२०२५)
|