सज्जनगडावर समर्थांचे समाधी मंदिर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधले. तेथे वरच्या बाजूला प्रभु श्रीरामाची मूर्ती आहे. हे मंदिर गडावरील सगळ्यात जुनी वास्तू नाही, तर शिवछत्रपतींनी स्वतःच्या निवासासाठी बांधलेला वाडा ही गडावरील सर्वांत जुनी वास्तू आहे. समर्थांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ येथे व्यतीत केला. शिवछत्रपतींनी गडावरील मोठा खड्डा बुजवण्याची आज्ञा मावळ्यांना दिली. श्री समर्थांनी सांगितले, ‘खड्डा बुजवू नये; कारण पुढे त्याचा उपयोग होणार आहे.’ याचा संदर्भ देणारी घटना पुढे दिली आहे.

तमिळनाडूमधील अरणी गावात समर्थांचे नेहमी येणे जाणे असे. हे ठिकाण तंजावरपासून जवळ आहे. तंजावरमध्ये समर्थांचे ७ मठ कार्यरत आहेत. अरणी गावात पितळ्यापासून किंवा पंचधातूपासून देवदेवतांच्या अत्यंत सुंदर मूर्ती घडवणारे कारागीर परंपरागत रहात आहेत. त्या काळी समर्थांना वाटले की, या सर्व मूर्तीकारांमध्ये सर्वांत उत्कृष्ट कला असलेला मनुष्य कोण ? त्यांना कळले की, तेथे एक वृद्ध कारागीर आहे; परंतु मूर्ती घडवतांना धातूचे कण डोळ्यांत जाऊन त्याची दृष्टी अधू झाली आहे. त्यामुळे त्याने मूर्तीकला थांबवली. समर्थांनी कारागिराला सांगितले, ‘‘मला नित्य पूजेसाठी रामपंचायतन बनवून हवे. ते तुमच्या हातूनच बनवले पाहिजे, असा माझा अट्टाहास आहे.’’ कारागीर रडू लागला. त्याने अडचण समर्थांना सांगितली.
समर्थ म्हणाले, ‘‘माझ्या प्रभु रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी या चर्मचक्षूंची आवश्यकता नाही. तो आत्माराम तुझ्या माझ्या अंतरंगात वास करत आहे. त्याचे दर्शन अंत:चक्षूंनीसुद्धा होऊ शकते. रामरायाची इच्छा दिसते की, तुझ्या हातूनच पुन्हा प्रकट व्हावे. त्यामुळे तूच त्या मूर्ती घडवणार आहेस.’’ त्यांनी कारागिराच्या डोक्यावर हात ठेवला. त्याचे देहभान हरपले. त्याच्यासमोर तेजाचा झोत दिसू लागला. तेजाच्या गोळ्याचे रूपांतर श्रीरामाच्या सुंदर मनोहारी मूर्तीत झाले. साक्षात श्रीरामाने कारागिराला दर्शन दिले. तो कृतकृत्य झाला. समर्थांच्या भेटीने त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्याने प्रभु रामचंद्र, श्री सीतामाई, श्री लक्ष्मण आणि दासमारुति यांच्या अप्रतिम मूर्ती घडवल्या. मूर्ती पाहून समर्थांनी प्रसन्न होऊन कारागिराला विचारले, ‘‘तुला काय हवे, ते माग.’’ कारागीर म्हणाला, ‘समर्थ आपले दर्शन जाहले, साक्षात् प्रभु रामचंद्रांचे दर्शन झाले ! या डोळ्यांनी आता अन्य काही पहायची इच्छा उरलेलीच नाही. माझी दृष्टी आंधळी करा, अशी प्रार्थना आहे, म्हणजे आत्मारामाच्या चिंतनात उरलेला काळ व्यतीत करता येईल !’ समर्थांनी त्याची दृष्टी घालवली नाही; परंतु सतत त्या आत्मारामाचे दर्शन घडेल, अशी आत्मदृष्टी त्याला देऊन आशीर्वाद दिले.

समर्थांनी गडावरील शेजघरात १४ दिवस मूर्ती पुजल्या. १५ व्या दिवशी समर्थ आसनावरून उठून खाली बसले. त्रिवार रामरायाचा जयजयकार केला आणि त्यांच्या देहातून प्राणज्योतीचा मोठा लोळ बाहेर पडून तो थेट रामाच्या मूर्तीमध्ये शिरला. शिष्यांनीही ते हे कळताच पाहिले. छत्रपती संभाजी महाराज सज्जनगडावर आले. मठाच्या शेजारच्या खड्डयात समर्थांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले. दुसर्या दिवशी चितेच्या स्थानी स्वयंभू समाधी प्रकट झाली. त्याच समाधीवर पावणेदोन महिन्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी समाधी मंदिर बांधले. समाधीच्या वर प्रभुरामचंद्रांच्या याच मूर्तींची स्थापना करण्यात आली. समर्थांचे प्राण मूर्तीत प्रविष्ट झालेले असल्यामुळे वेगळी प्राणप्रतिष्ठा केली नाही. भारतातील हे एकमेव मंदिर असावे. या मूर्ती वर्षातून पाच वेळा अंगणात धुतल्या जातात.
आरणीकराने रामरायाच्या मूर्तीला डोळे काढलेले नाहीत. एका अंध कारागिराने केलेल्या मूर्तीची ओळख म्हणून ती कायम आहे !
या रामाच्या मूर्तीकडे पहातच रहावेसे वाटते, इतकी ती सुंदर आहे; कारण साक्षात श्रीरामाला समोर उभे करून ती बनवलेली आहे. एकवार सज्जनगडावर जाऊन या मूर्तीचे अवलोकन करावे.
जय जय रघुवीर समर्थ ।
(साभार : ‘दासबोध’ संकेतस्थळ)