पतीच्या निधनानंतर स्थिर राहून मनात समष्टी सेवेचा विचार करणार्‍या कोपरगाव, नाशिक येथील श्रीमती निर्मला दिलीप सारंगधर (वय ५५ वर्षे) !

कै. दिलीप सारंगधर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती निर्मला दिलीप सारंगधर यांच्याविषयी त्यांची मुलगी सौ. काव्या दुसे यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीमती निर्मला सारंगधर

१. सामूहिक प्रार्थना करून घेणे : ‘माझ्या बाबांच्या निधनानंतर आईने स्मशानभूमीच्या ठिकाणी माझे यजमान श्री. किरण दुसे (जावई) यांना सामूहिक प्रार्थना घ्यायला सांगितली.

२. सर्वांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगणे : बाबांचे सर्व विधी भावपूर्ण होण्यासाठी आईने सर्वांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यासाठी उद्युक्त केले. कधी आमच्याकडून नामजप होत नसे, तेव्हा ती लगेच आम्हाला नामजपाची आठवण करून देत असे.

३. पतीनिधनाच्या दुःखावर मात करण्यासाठी जावयाकडून स्वयंसूचना सिद्ध करून घेणे : ‘बाबांची आठवण आल्यावर आईला रडू यायचे, तेव्हा ती लगेच नामजप करून स्वतःला सावरायची आणि स्थिर रहाण्याचा प्रयत्न करायची. या परिस्थितीत स्थिर रहाता येण्यासाठी तिने माझे यजमान श्री. किरण दुसे यांच्याकडून स्वयंसूचना सिद्ध करून घेतल्या आणि त्या स्वयंसूचना घेऊन तिने १५ दिवसांत दुःखावर मात केली.

४. वडिलांच्या निधनानंतरच्या पहिल्या १० दिवसांत भक्तीसत्संग ऐकणे : बाबांच्या निधनाच्या तिसर्‍या दिवशी आम्ही बाबांच्या अस्थी गोळा करून घरी आल्यावर तिने दुपारी भक्तीसत्संग ऐकला. दहाव्या दिवशीही दुपारी सर्व नातेवाईक घरात असतांना एका बाजूला बसून ती भक्तीसत्संग ऐकत होती. यातून तिची साधनेची ओढ आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याची सिद्धता माझ्या लक्षात आली.

५. अखंड समष्टी सेवेचा विचार असणे

५ अ. भेटायला येणार्‍यांशी पतीविषयी अधिक न बोलता सर्वांना सनातन संस्थेच्या कार्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणे : बाबांच्या निधनानंतर थोडी सावरल्यावर तिच्या मनात ‘भेटायला येणार्‍या लोकांपैकी ‘कुणाकडून विज्ञापन आणि कुणाकडून अर्पण घेऊ शकतो ?’, ‘कुणाला संपर्क करून साधना सांगू शकतो ?’, असे विचार असायचे. ती त्यांना ‘आमची मुलगी (मी) आणि जावई सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधना करत आहेत’, याविषयी सांगून येणार्‍या लोकांमध्ये सनातन संस्थेच्या कार्याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करायची. ती लोकांशी बाबांविषयी अधिक न बोलता सनातन संस्थेच्या कार्याविषयी सांगून त्यांना साधनेकडे वळवण्याचा प्रयत्न करायची. काही लोक तिला भेटून गेल्यानंतर ती मला सांगायची, ‘‘हे पहिल्यांदाच आपल्याकडे आले आहेत. यांना आपण साधना सांगूया.’’

५ आ. सेवेतून मिळणार्‍या चांगल्या ऊर्जेमुळे सेवा केल्यावर ‘मायेच्या विचारांतून बाहेर पडता येईल’, असे आईला वाटणे : बाबांच्या निधनाच्या तिसर्‍याच दिवशी तिने मला विचारले, ‘‘असे घरात किती दिवस बसून रहाणार ? सेवेला बाहेर पडल्यावर मनाची स्थिती पालटून मन सकारात्मक होईल. घरात बसून राहिल्यावर मनात आठवणी आणि विचार येतात. सेवेत राहिल्यावर मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते.’’ हे तिचे बोलणे ऐकून ‘तिचे मन तिला समष्टी सेवेकडे ओढत होते’, असे माझ्या लक्षात आले.

६. वडील त्यांच्या छायाचित्रातून ‘तू तुझी साधना कर’, असे सांगत आहेत’, असे आईला जाणवणे : घरात लावलेल्या बाबांच्या छायाचित्रातून बाबा ‘तू नामजप कर. माझ्यामध्ये अडकू नकोस. तू तुझी साधना करत रहा’, असे म्हणत आहेत’, असा तिला भास होत असे. त्यामुळे लगेच तिचा नामजप चालू होत असे.

७. गुरुकार्याविषयीची तळमळ : ‘या प्रसंगात आम्हाला साहाय्य व्हावे’, यासाठी काही ओळखीच्या लोकांनी पैसे दिले. एकाने ‘मी तेलाचा डबा देऊ का ?’, असे विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘मी गुरुपौर्णिमेचे अर्पण घ्यायला येईन, तेव्हा द्या. तेव्हा आम्हाला तेलाचा डबा लागणार आहे.’’ ती मला म्हणाली, ‘‘ज्यांनी पैसे दिले आहेत, त्यांच्या नावाची पावती करून ते पैसे सनातन संस्थेमध्ये जमा करूया.’’ यातून तिची गुरुकार्याविषयीची तळमळ लक्षात आली.’

८. अनुभवलेली गुरुकृपा !

८ अ. भावनाशील स्वभाव असूनही गुरुकृपेने आई स्थिर होणे : बाबा गेल्यानंतर १७ व्या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधव हे कुटुंबियांसह भेटायला आले होते. त्यांनी आईकडे पाहून आश्चर्य व्यक्त केले, ‘‘काकू इतक्या लवकर कशा सावरल्या ? काकूंचा स्वभाव भावनाशील आहे; पण त्यांनी फार लवकर यावर मात केली.’’ सद्गुरु जाधवकाकांचे हे बोलणे ऐकून ‘गुरुदेवांचीच आमच्यावर कृपा आहे. त्यांनाच आमची काळजी आहे’, हे मला प्रकर्षाने जाणवले.

८ आ. आईच्या सांत्वनासाठी संतांनी केलेल्या भ्रमणभाषचे ध्वनीमुद्रण ऐकून मनातील दुःखाच्या विचारावर मात करणे : बाबांच्या निधनाच्या पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत गुरुकृपेने आईला अनेक संतांचे भ्रमणभाष आले. तेव्हा तिने संतांचे भ्रमणभाषवरील हे बोलणे आम्हाला ध्वनीमुद्रित करायला सांगितले होते. तिला जेव्हा फार दुःख वाटत असे, तेव्हा ती ते ध्वनीमुद्रण ऐकून त्यातून बाहेर पडते.

८ इ. या दिवसात आईचा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अखंड होत होता.

या सर्वांतून तिला ‘गुरुदेवांचे माझ्याकडे लक्ष आहे’, असे वाटून कृतज्ञता वाटायची.’

– सौ. काव्या दुसे (श्रीमती निर्मला दिलीप सारंगधर यांची कन्या), कोल्हापूर, (१५.५.२०२४)