
‘होळीला लाकडे जाळल्याने प्रदूषण होते, वृक्षतोड होते; म्हणून होळी पेटवू नका’, ही धूसफूस होळीनिमित्त कथित पुरोगाम्यांकडून न चुकता होत असते, यात काही वाद नाही; पण या कथित पुरोगाम्यांचे पुरोगामित्व खरे कि खोटे ? यासाठी त्यांनी विज्ञानाचेच पुढील उदाहरण लक्षात घ्यायला हवे.
सूक्ष्मजीवशास्त्रात (‘मायक्रोबायोलॉजी’मध्ये) ‘फ्लेम स्टेरलायझेशन’, अशी निर्जंतुकीकरणाची एक प्रक्रिया आहे. यात पात्रातील पदार्थ टिकून रहाण्यासाठी पात्राच्या तोंडाजवळील भाग आगीच्या जवळ निर्जंतुक केला जातो. यामुळे हानीकारक सूक्ष्मजीवांचा पात्रातील प्रवेश प्रतिबंधित होतो. अनेक मोठमोठ्या रासायनिक प्रयोगशाळांमध्ये ही पद्धत वापरली जाते. ‘फ्लेम स्टेरलायझेशन’मुळे निर्माण होणारा थोडासा वायू आणि कारखान्यातील धगधगत्या आगीमुळे निर्माण होणारा दूषित वायू यांच्यात जो भेद आहे, तोच भेद होळीत जळालेल्या लाकडांमधून निघणारा वायू अन् कारखान्यांतून बाहेर पडणारा प्रदूषित वायू यांच्यात आहे.
हिंदूंचे सण-उत्सव हे सर्वाधिक पर्यावरणपूरक असल्याचे आता विदेशीही मान्य करत आहेत. होळीतून निघणार्या अग्नीमुळे प्रदूषण होत नाही, तर वातावरणाची शुद्धीच होते. कथित पुरोगाम्यांनी त्यांच्या आवडत्या विज्ञानाचे एवढेसे छोटे उदाहरण लक्षात घेतले, तरच हे पुरोगामी, नाहीतर अधोगामीच !
– सौ. प्रीती आनंद जाखोटिया, एम्.एस्.सी. (बायोटेक्नोलॉजी-जैवतंत्रज्ञान), फोंडा, गोवा. (११.३.२०२५)