Ukraine Russia War Ceasfire : युक्रेन ३० दिवसांच्या युद्धविरामासाठी सिद्ध : डॉनल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी !

कीव (युक्रेन) – तीन वर्षांहून अधिक काळ चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध  आता महिन्याभराकरिता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने युक्रेनला  सैनिकी साहाय्य आणि गुप्तचर माहिती देण्यावरील बंदी उठवल्याची घोषणा केल्यानंतर युक्रेनने तात्काळ युद्धबंदी लागू करण्यास सिद्धता दर्शवली. यासंदर्भात सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेन यांच्या अधिकार्‍यांमध्ये उच्चस्तरीय चर्चाही झाली.

१. व्हाईट हाऊस आणि कीव यांच्या संयुक्त निवेदनानुसार युद्धबंदी प्रस्तावात तात्पुरती युद्धबंदीची तरतूद आहे, जी दोन्ही बाजूंनी मान्य केल्यास पुढेही वाढवता येऊ शकते.

२. या वर्षाच्या प्रारंभी डॉनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने पदभार स्वीकारल्यानंतरचा रशिया-युक्रेनसंदर्भातील हा पहिलाच महत्त्वाचा राजनैतिक प्रयत्न आहे.

३. युक्रेनने या योजनेशी त्याची वचनबद्धता दर्शवली असली, तरी आता सर्वांची दृष्टी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या प्रतिक्रियेवर आहे.

४. डॉनल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे येत्या काही दिवसांत पुतिन यांना थेट प्रस्ताव सादर करण्यासाठी मॉस्कोला जाणार आहेत, तर ट्रम्प स्वतः या आठवड्याच्या शेवटी पुतिन यांच्याशी दूरभाषवरून बोलणार आहेत.

५. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी रशियाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले आहे की, जर मॉस्कोने युद्धबंदी नाकारली, तर शांततेच्या मार्गात कोण अडथळा आणत आहे, हे स्पष्ट होईल.

६. ट्रम्प आणि वोलोदिमिर झेलेंस्की यांच्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात व्हाईट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात मोठा वाद झाला होता. त्यानंतर युक्रेनला अमेरिकेकडून होत असलेले साहाय्य थांबवण्यात आले होते. आता युक्रेनने युद्धबंदीला स्वीकृती दर्शवल्यानंतर अमेरिकेने त्याला सैनिकी पाठिंबा पुन्हा घोषित केला आहे.