मंदिर प्रवेशद्वारावरील शौचालय हटवण्यासाठी आयुक्तांना १ लाख पत्रे पाठवणार

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या पावित्र्य रक्षणासाठी ‘बसव ब्रिगेड’ची ‘पत्र मोहीम’ !

मंदिराच्या शेजारी असलेले शौचालय

सोलापूर – अनेक वर्षांपासून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्येकडील प्रवेशद्वाराजवळ असलेले शौचालय काढण्याची मागणी अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडून महापालिकेकडे करण्यात येत आहे. या शौचालयामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होत असून ते तातडीने हटवण्यासाठी १ लाख सिद्धेश्वर भक्त आयुक्तांना पत्र पाठवणार असल्याची माहिती ‘बसव ब्रिगेड’चे शहराध्यक्ष अमित रोडगे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली आहे. (एवढी पत्रे का पाठवावी लागतात ? महापालिका प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

श्री सिद्धरामेश्वर

अमित रोडगे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हिंदु धर्म आणि वास्तूशास्त्र यांनुसार ईशान्य दिशा पवित्र मानली जाते. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या शौचालयामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. महापालिकेला अनेकदा विनंती करूनही महापालिका नेहमी याकडे डोळेझाक करत आहे. (जी गोष्ट हिंदूंच्या लक्षात येते तीच गोष्ट महापालिका प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंच्या धार्मिक भावनांना नेहमीच डावलेले जाते हेच यावरून लक्षात येते ! – संपादक) त्यामुळे आम्ही १० मार्चपासून या पत्र मोहिमेचा आरंभ करत आहोत, असे अमित रोडगे म्हणाले. यामध्ये सहभागी होण्यासाठी शिवराज विभूते – ७२४९४ ४४४७४, अमित रोडगे – ८८३०९०२११२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.