११ मार्चला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार !

सांगली, ९ मार्च (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद येथील क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याचे चालू असलेले उदात्तीकरण त्वरित थांबवण्यात यावे, या मागणीसाठी ११ मार्च या दिवशी ‘चलो छत्रपती संभाजीनगर’ अशी हाक हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने देण्यात आली होती; मात्र छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकार्यांनी हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे येऊन आंदोलन करण्यास अनुमती नाकारली, तसेच हिंदु एकता आंदोलनाच्या प्रमुख पदाधिकार्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदीच्या नोटिसाही बजावल्या आहेत, तसेच छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन आंदोलन करू नये, अशी विनंती सांगली येथील पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन आंदोलन न करता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय हिंदु एकता आंदोलनाने घेतला आहे. त्यामुळे ११ मार्च या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिनादिवशी सकाळी ११ वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
‘क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर असलेला हजरत औरंगजेब नावाचा फलक तात्काळ हटवा. त्या जागी ‘क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे’ अशा नावाचा फलक लावा. औरंगजेबाच्या थडग्यावर गलफ (कबरीवर घालण्याचे कापड), फूल, चादर चढवून, नतमस्तक होण्यासाठी राजकीय नेत्यांना बंदी घाला’, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न इतर आमदारांनी उपस्थित करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवभक्त आणि राष्ट्रभक्त यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी केले आहे. त्यांच्याच अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.