जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांचा परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना प्रश्न

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – परराष्ट्रमंत्र्यांनी नुकतेच ‘पाकव्याप्त काश्मीर भारतात आल्यावर काश्मीरची समस्या सुटेल’, असे विधान केले आहे. तथापि आम्ही पाकव्याप्त काश्मीर आणण्यासाठी त्यांना कुठे अडवले आहे ? तुम्ही जम्मू-काश्मीरचा नकाशा पाहिलात, तर त्यात आपला एक मोठा भूभाग पाकिस्तानात असल्याचे दिसते; मात्र काश्मीरचा आणखी एक मोठा भाग चीनच्या नियंत्रणात आहे. त्यावर कुणीच काही बोलत नाही, अशा शब्दांत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर टीका केली. चीनने काश्मीरचा भाग असणार्या अक्साई चीनवर नियंत्रण मिळवलेले आहे. जयशंकर यांनी लंडन येथील एका कार्यक्रमात ‘पाकिस्तानने बळकावलेला काश्मीर भारताला पुन्हा मिळण्याची आम्ही वाट पहात आहोत. तो भाग भारताकडे परत आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल’, असे म्हटले होते.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भाजपवर टीका करतांना म्हणाले की, तुम्ही लोकांनी जम्मू-काश्मीरचे २ तुकडे केले आहेत. आता म्हणत आहात की, लडाखच्या लोकांना हेच हवे होते; परंतु तुम्ही खरेच कधी लडाखच्या लोकांना विचारले का की, त्यांना नेमके काय हवे होते ? काय हवे आहे ?
संपादकीय भूमिकाअब्दुल्ला घराण्याने आतापर्यंत पाकप्रेमी भूमिका घेतल्यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारतात येऊ शकलेला नाही, हे भारतियांना ठाऊक आहे ! |