मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होईपर्यंत विरोधी पक्षांकडून विरोधी पक्षनेत्यासाठी अध्यक्षांकडे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याविनाच ३ मार्च या दिवशी विधीमंडळाच्या कामकाजाला प्रारंभ झाला.
विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहात सकाळी ११ वाजता राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण यांचे अभिभाषण झाले. त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाजाला प्रारंभ झाला. ‘दोन्ही सभागृहांमध्ये ‘वन्दे मातरम्’ आणि महाराष्ट्र गीत झाल्यावर कामकाजाला प्रारंभ करण्यात आला. सर्वपक्षीय आमदारांनी सभागृहामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित आमदारांची ओळख सभागृहात करून दिली. यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. अभिभाषणाविषयी आभार प्रदर्शन आणि अनुमोदन यांचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. ४ आणि ५ मार्च या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. ६ आणि ७ मार्च या दिवशी पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योगेश सागर, संजय केळकर, बबनराव लोणीकर, रमेश बोरणारे, दिलीप बनकर, बाबूसाहेब पठारे, सुनील राऊत आणि अमित जनक यांची ‘तालिका अध्यक्ष’ (अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले सदस्य) म्हणून नावे घोषित केली. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, माजी आमदार प्रदीप जाधव-नाईक, मुकुंदराव मानकर, उपेंद्र शेंडे, तुकाराम बिरकड यांच्या दु:खद निधनाविषयी शोकप्रस्ताव मांडला. शोकप्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.