गुरूंच्या आत्मज्योतीने प्रगट झाली आणखी एक आत्म‘ज्योती’ ।
किती वर्णावी ज्ञानस्वरूप गुरुरायांची महती ।।

सनातन आश्रम, गोवा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – संसारिक जीवनात उपास्यदेवता आणि कुलदेवता यांच्या जोडीला गुरूंचीही भरभरून कृपा होणे, हे दुर्मिळच ! बांदिवडे येथील श्री महालक्ष्मीदेवी, कुलदेवता श्री विजयादुर्गादेवी आणि गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा प्रत्येक क्षणी अनुभवणार्या बांदिवडे, फोंडा (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ६२ वर्षे) या ७२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संत झाल्याची घोषणा २४ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंदवार्ता उपस्थितांना दिली. गोव्यातील साधक ज्या क्षणाची वाट पहात होते, तो क्षण अखेर आला… ! या प्रसंगी सर्वांनीच कृतज्ञताभाव, चैतन्य आणि आनंद यांची भरभरून अनुभूती घेतली. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या या सोहळ्याला पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची आई श्रीमती कालिंदी गावकर (वय ८६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), बहीण सौ. श्रुती नितीन सहकारी, भावोजी श्री. नितीन सहकारी, चुलत बहीण सौ. स्मिता बखले, नणंद सौ. दुर्गा देसाई, जाऊ सौ. लता दीपक ढवळीकर (वय ६५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सौ. लताताई यांची बहीण सौ. गायत्री गाडगीळ, सौ. लताताई यांचे भाऊ श्री. गुरुप्रसाद साधले, भाची कु. पूर्वा आणि भाचा श्री. प्रणव साधले, यांच्यासह सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. पृथ्वीराज हजारे, पू. (श्रीमती) सुमन नाईक, तसेच प्रसारातील आणि आश्रमातील साधक उपस्थित होते.
पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांनी व्यक्त केलेले मनोगत
‘गुरुदेवांनी आज दिलेला हा प्रसाद माझ्यासाठी परीसस्पर्शच आहे. मी काहीच केले नाही. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे. पुढील साधनाही त्यांनीच करून घ्यावी. सर्व साधक, संत, सद्गुरु, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे प्रेम मला मिळाले. सर्वांमुळे मी घडले. सर्वांप्रती कृतज्ञता !’ (या वेळी पू. (सौ.) ज्योतीताई यांची पुष्कळ भावजागृती होत होती.)
राजकीय वातावरणात राहून ‘सात्त्विक वृत्ती आणि साधना’ यांद्वारे ७२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या १३२ व्या संतपदावर विराजमान झालेल्या सौ. ज्योती सुदिन ढवळीकर !

गोव्यातील सौ. ज्योती सुदिन ढवळीकर या वर्ष १९९९ पासून सनातनच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्यांचे पती मा. श्री. सुदिन माधव ढवळीकर गोव्याचे वीजमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. खरेतर संसारात राहून साधना करणे, ही अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एकत्र कुटुंबात राहून साधना करणेतर महाकठीण आहे. असे असतांना उपजतच सात्त्विक आणि धार्मिक वृत्ती असलेल्या सौ. ज्योती ढवळीकर यांनी ‘शांत, स्थिर आणि श्रद्धाळू स्वभाव, उत्तम नियोजनकौशल्य, कुटुंबवत्सलता अन् कर्तव्यनिष्ठा’ या गुणांद्वारे संसार उत्तम प्रकारे सांभाळून आध्यात्मिक उन्नतीही करून घेतली. ‘साधनेमुळे राजकारणाकडेही त्यांनी आध्यात्मिक दृष्टीने पाहिले’, हे अत्यंत कौतुकास्पद आणि अनुसरणीय आहे.
खरेतर सत्ता, अधिकार आणि हाती पैसा आल्यावर व्यक्ती अहंकारी बनते अन् देवा-धर्मापासून दूर जाते; पण सौ. ज्योती ढवळीकर हे एक अत्यंत विरळ उदाहरण आहे. ‘अल्प अहं, सर्वांशी समभावाने वागणे, इतरांना साहाय्य करणे, परेच्छेने वागणे आणि व्यवहार अन् अध्यात्म यांचा सुरेख संगम साधणे’, आदी गुणांमुळे त्यांची अध्यात्मात जलद गतीने प्रगती होत आहे.
वर्ष २०१३ मध्ये सौ. ज्योती ढवळीकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. वर्ष २०२४ च्या गुरुपौर्णिमेला त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती. आजच्या शुभ दिनी ७२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘समष्टी संत’ म्हणून त्या सनातनच्या १३२ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत. पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांनी ‘राजकीय वातावरणात राहूनही साधनेत प्रगती करून संतपद गाठता येते’, हे सिद्ध करून दाखवले आहे.
‘पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची पुढील प्रगतीही जलद गतीने होवो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२४.२.२०२५)
…असे उलगडले संतपदाचे गुपित !
सनातनची साधना करणार्या अनेक साधकांनी अध्यात्मात प्रगती केली. त्यातील कुणी अभियंता, कुणी उद्योजक, कुणी गृहिणी आहे, तर कुणी पूर्णवेळ साधना करणारे आहेत. प्रत्येकच साधकाच्या साधनेच्या प्रयत्नांतून अन्य साधकांना शिकायला मिळते. त्या दृष्टीने एकत्र कुटुंबात आणि राजकीय वातावरण असलेल्या ढवळीकर कुटुंबातील सौ. ज्योती अन् सौ. लता ढवळीकर यांच्या साधनेचे प्रयत्न जाणून घेण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. यात सौ. ज्योती ढवळीकर यांची साधना आणि सेवा यांची तळमळ, सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती असलेला त्यांचा आत्यंतिक भाव अन् गुरुदेवांची शिकवण पदोपदी आचरणात आणण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न यांसह परिस्थिती स्वीकारणे, कुटुंबवत्सलता, घरातील राजकीय वातावरणात राहूनही सर्वांप्रती असलेला प्रेमभाव, स्थिरता, साक्षीभाव अन् प्रत्येक क्षणी त्या करत असलेल्या भावजागृतीचे प्रयत्न आदी त्यांच्या साधनेचे पैलू, तसेच सौ. लता ढवळीकर यांचा साधनेचा प्रवास श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडला.
या वेळी ‘गुणांनी प्रकाशली ही ईश्वराची ज्योती । संतपद गाठून आज गुरुचरणी समर्पित झाली ही ज्योती ।।’, असे सांगत कवितेद्वारे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सौ. ज्योती ढवळीकर यांच्या संतपदाची घोषणा केली आणि साधकांना आनंदाची भावभेट दिली. संतपदाची घोषणा झाल्यावर पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांनी अत्यंत कृतज्ञताभावाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांवर डोके ठेवून भावपूर्ण नमस्कार केला. कवितेतील शब्द ऐकतांना ‘माझी एवढी योग्यता नाही’, असे पू. (सौ.) ज्योतीताई म्हणाल्या. यातूनच ‘त्यांच्यात अहं किती अल्प आहे’, याचे उपस्थितांना दर्शन झाले.
पूर्णवेळ साधना करण्यासाठी साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीने कौल दिला, अशा एकमेव पू. (सौ.) ज्योती ढवळीकर ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

मुलाखतीत पू. (सौ.) ज्योतीताई यांनी सांगितले, ‘‘माझ्यासह साधना चालू केलेले काही साधक पूर्णवेळ साधना करू लागले, तेव्हा ‘मला कधी पूर्णवेळ साधना करता येणार ?’, असे वाटायचे. तेव्हा ‘एकत्र कुटुंबातील दायित्व सांभाळून मी नोकरीचा वेळ सेवा-साधना यांसाठी देऊ शकते’, असा विचार माझ्या मनात आला. यजमानांना त्याविषयी विचारल्यावर त्यांनी ‘श्री महालक्ष्मीदेवीला कौल लावूया’, असे सांगितले. सासरे (कै.) श्री. माधव ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) हे देवीला कौल लावत असल्याने त्यांनाही मी याविषयी धीर करून विचारले. त्यांनी लगेचच मंदिरात जाऊन देवीला कौल लावला आणि घरी येऊन सांगितले, ‘‘ज्योती, महालक्ष्मीदेवीने मागताक्षणीच कौल दिला. तू आनंदाने साधना कर.’’ ‘पूर्णवेळ साधना करण्याचा माझ्या मनातील विचार, ही ईश्वरेच्छाच आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर साधनेत कोणतीही अडचण आली नाही.’’
‘पूर्णवेळ साधना करण्यासाठी साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीने कौल दिला’, अशा पू. (सौ.) ज्योतीताई या सनातनच्या इतिहासात एकमेव आहेत. गुरुदेव साक्षात् श्रीविष्णुस्वरूप आहेत आणि श्री महालक्ष्मीदेवीनेच ज्योतीताईंचा श्रीविष्णुपर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ केला’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले.
‘साधकांच्या प्रतिनिधी’ पू. (सौ.) ज्योती ढवळीकर !

१९.२.२०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सहस्रदीप-दर्शन सोहळा पार पडला. ‘गुरुकार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी साधकांना प्रकाशरूपी ऊर्जा मिळावी’, याकरता झालेल्या या सोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हातांतील दीप प्रज्वलित केले होते अन् त्यांनी साधकांच्या प्रतिनिधी म्हणून अनुक्रमे सौ. ज्योती ढवळीकर अन् सौ. लता ढवळीकर यांच्या हातांतील दीप प्रज्वलित केले होते. या सोहळ्यात प्रकाशरूपी ऊर्जा गुरुतत्त्वाकडून त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांच्याकडे प्रवाहित झाली आणि नंतर साधकांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सर्व साधकांना ती लाभली. या सोहळ्यासाठी ‘साधकांच्या प्रतिनिधी’ म्हणून सौ. ज्योती ढवळीकर आणि सौ. लता ढवळीकर यांची निवड सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी केली होती.
एकमेकांना आधार देणारे आणि कलियुगातही एकत्र रहाणारे ढवळीकर कुटुंबीय !
‘आताच्या विभक्त कुटुंबपद्धतीच्या काळातही ढवळीकर कुटुंबीय एकत्रितपणे रहातात. सर्व कुटुंबीय मनाने एक आहेत. घरातील सणावारी एकत्र येऊन आनंद साजरा करण्यासह कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणात, कठीण प्रसंगांत सर्वजण एकमेकांना पुष्कळ साहाय्य करतात. कुटुंबातील डॉ. संदीप ढवळीकर हे आधुनिक वैद्य आहेत. कुटुंबातील कुणालाही कसलाही आजार झाल्यास ते स्वतःची कामे सोडून साहाय्य करतात. आजारपणाच्या काळात एकमेकांची काळजी घेणे, हवे-नको ते पहाणे, मुलींच्या बाळंतपणाच्या काळात एकमेकांना समजून घेऊन आधार देणे, अशा कृती या कुटुंबातील सर्व जण करतात. सर्वांमध्ये एकमेकांप्रती पुष्कळ प्रेमभाव आहे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अनुभवलेली पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची गुणवैशिष्ट्ये आणि सांगितलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग !
पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची जन्मतिथी अक्षय्यतृतीया ही आहे. अक्षय्यतृतीयेलाच श्रीविष्णुच्या परशुराम अवताराची जयंतीही असते. पू. (सौ.) ज्योतीताई यांचा विवाहही याच शुभतिथीला झाला. त्यांची माहेर आणि सासर दोन्हीकडील कुलदेवता श्री विजयादुर्गादेवी आहे. जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांच्या वेळी त्यांना देवतांची कृपा लाभणे, हा दैवी योगच आहे.
भगवान पशुरामांच्या गोमंतभूमीत त्यांच्याच जयंतीच्या तिथीला जन्म आणि विवाह होणे अन् माहेर आणि सासरची कुलदेवताही एकच असणे, असे वैशिष्ट्य असलेल्या पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांचे उदाहरण दुर्मिळ आहे !
– श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ
१. ‘साधनेत येण्यापूर्वी मी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) बँकेत नोकरीला होते, तेथे ज्योतीताईंकडे बघून मला वेगळे वाटायचे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी कुतुहल वाटायचे. त्यांच्यामुळेच माझी साधनेविषयी जिज्ञासा वाढली. त्या साधना करत असल्यामुळे त्यांच्यात हे वेगळेपण होते, हे मला लक्षात आले.
२. बँकेचे काम झाल्यावर आम्ही साधक अध्यात्मप्रसारासाठी परिसरात कुठे जायचे ? काय सेवा करायची ? आदी चर्चा करायचो. ज्योतीताईंना सेवेसाठी येता यायचे नाही. याची त्यांना पुष्कळ खंत वाटायची आणि त्या पुष्कळ रडायच्या. अशी खंत अनेकांमधील एखाद्यालाच वाटते. त्यांना सेवेची पुष्कळ तळमळ होती. ‘सेवा आम्ही करतो; पण ज्योतीताईंमधील तळमळीमुळे त्या सेवेचा आमच्यापेक्षा अधिक लाभ देव त्यांना करून देत असणार’, असे मला वाटायचे. परिस्थिती स्वीकारणे ही सर्वाेत्तम साधना आहे, ही गुरुदेवांची शिकवण त्यांनी अंतर्मनात बिंबवली. त्यामुळे परिस्थिती स्वीकारून त्या साक्षीभावाच्या टप्प्यापर्यंत लवकर पोचल्या.
३. ज्योतीताईंशी जेव्हा बोलणे होते, तेव्हा कधीही ‘त्या तणावात आहेत’, ‘त्यांना कशाची काळजी वाटत आहे’, असे अनुभवले नाही. कधीही त्यांना उद्विग्न अथवा निराश झालेले पाहिले नाही. त्यांना नेहमीच भावस्थितीत अथवा कृतज्ञताभावातच पाहिले. ही त्यांच्यावरील देवता आणि गुरु यांचीच कृपा आहे. साधना करतांना काही साधकांची साधना कमी-जास्त होत असते, साधनेत चढ-उतार होत असतात, तसे ज्योतीताईंविषयी कधीच जाणवले नाही. त्यांच्याशी जेव्हा संपर्क व्हायचा, तेव्हा ‘प्रत्येक परिस्थितीत त्यांची साधना अखंड चालू आहे’, असेच लक्षात आले.
४. एकदा ज्योतीताईंची गुरुदेवांशी भेट झाली. तेव्हा सत्संगातील अनेक साधक ते करत असलेली सेवा, साधना, त्यांना मिळत असलेला आनंद यांविषयी सांगत होते. तेथे उपस्थित ज्योतीताई यांनी गुरुदेवांना सांगितले, ‘‘गुरुदेव, या सर्वांसारखी सेवा, साधना मी काही करू शकत नाही; पण केवळ तुम्ही आजपर्यंत दिलेल्या शिकवणीनुसार आचरण करण्याचा आणि प्रत्येक कृती साधना म्हणून करण्याचा प्रयत्न करते.’’ प्रत्येक कृतीद्वारे अखंड साधनारत रहाण्याची गुरुदेवांची शिकवण त्यांनी आत्मसात केली, याविषयी गुरुदेवांनी ज्योतीताईंचे पुष्कळ कौतुक केले होते.
५. आश्रमात होणारे विविध विधी, याग यांसाठी काही वस्तूंची जेव्हा आवश्यकता असते, तेव्हा ज्योतीताई त्या वस्तू नेहमी तत्परतेने पाठवतात. एखाद्या विधीत विशिष्ट रंगाचे फूल अथवा कमळ आवश्यक असेल, तर त्यांच्या घरी ते मिळतेच. त्यांच्या घराच्या परिसरात एखादे चांगले फूल उमलल्यावर देवच त्यांना विचार देतो की, ‘ते आश्रमासाठी पाठवूया’ आणि त्या ते पाठवतात. तेव्हाच त्याची आश्रमात आवश्यकताही असते. असे बर्याचदा होते.
६. कमळाची पाने पाण्यावर तरंगतात. त्यांच्यावर पाणी टाकले, तरी त्यावर पाणी टिकत नाही. तशाच पू. (सौ.) ज्योतीताई या मायेत असूनही त्यांच्या मनाला मायेतील विचारांचा स्पर्श नाही. मायेत असूनही त्या ब्रह्माची अनुभूती घेतात, हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.’
कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत श्रीमती कालिंदी गावकर
(पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या आई, वय ८६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)

‘सौ. ज्योती अक्षय्यतृतीयेच्या सुमुहुर्तावर जन्माला आली असल्याने पुष्कळ भाग्यवान आहे. देवीच्या आशीर्वादानेच ती जन्माला आली. आज ती संत झाली. तिचे जीवन धन्य झाले. असे संतरत्न माझ्या पोटी जन्माला आले, हे माझे भाग्य आहे.’
सौ. श्रुति सहकारी (पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची लहान बहीण)

‘हे आनंदाचे क्षण अनुभवायला दिल्याविषयी तिन्ही गुरूंच्या चरणी कृतज्ञता ! कार्यक्रमासाठी येण्याचा निरोप मिळाला, तेव्हापासूनच आनंद वाटत होता. ३ दिवसांपूर्वी आमच्या घरात एक साप आला होता. ‘त्याला हळद-कुंकू वहावे’, असा विचार माझ्या मनात आला. तो विशिष्ट प्रकारचा साप लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. त्यानंतर लगेच कार्यक्रमाला येण्याचा निरोप मिळाला, तेव्हा श्री लक्ष्मीदेवीच्या संदर्भात काहीतरी असणार’, असे मला वाटले.
सौ. लता ढवळीकर (पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची जाऊ, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)

‘श्री. सुदिन आणि श्री. दीपक यांचे पणजोबा संत होते. आम्ही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमही करतो. ती संतपरंपरा पू. ज्योतीताईने चालू ठेवली. आता घरबसल्या मला संतसेवा मिळाली आहे. कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाहीत.’
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |