Russia-Ukraine Mineral War : रशियाकडे युक्रेनपेक्षा अधिक खाणी असल्याने अमेरिकेने ती विकसित करावीत !

अमेरिका खनिजांविषयी युक्रेन समवेत करार करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे अमेरिकेला आवाहन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

वॉशिंग्टन (अमेरिका) : रशियाकडे युक्रेनपेक्षा कितीतरी पट अधिक दुर्मिळ खनिजे आहेत. येथे असलेल्या खाणी विकसित करण्यासाठी रशिया अमेरिकेसमवेत काम करण्यास सिद्ध आहे. सायबेरियातील ॲल्युमिनियम खाणी विकसित करण्यास साहाय्य करून अमेरिकी आस्थापने चांगले पैसे कमवू शकतात, असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एका मुलाखतीत केले.

१. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात युक्रेनमधील खनिजांवरून करार केला जात असतांना पुतिन यांनी हे आवाहन केले आहे.

या करारानुसार युक्रेन त्याच्या खनिजांमधून मिळणार्‍या उत्पन्नाचा काही वाटा अमेरिकेला देणार आहे. ‘ही रक्कम किती असेल’, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की पुढील आठवड्यात अमेरिकेत पोचू शकतात.

२. अमेरिकेने एक प्रारूप करार सादर केला आहे. ज्यामध्ये तिने कोणत्याही सुरक्षा हमीविना युक्रेनच्या नैसर्गिक संसाधनांमधून मिळणार्‍या उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम मागितली. ट्रम्प प्रशासनाने युद्धाच्या वेळी दिलेल्या सैनिकी आणि आर्थिक साहाय्याची भरपाई म्हणून ही रक्कम देण्यात यावी, असे करारात म्हटले होते.

३. अमेरिकेला दुर्मिळ खनिजे देण्यासाठी ट्रम्प जवळजवळ महिनाभर युक्रेनच्या सरकारवर दबाव आणत होते. ‘जर युक्रेनला अमेरिकेचे साहाय्य हवे असेल, तर त्याला अमेरिकेला ५०० अब्ज डॉलर्स किमतीची दुर्मिळ खनिजे द्यावी लागतील’, असे ते म्हणाले होते. त्यांनी झेलेंस्की यांना धमकी दिली होती की, जर त्यांनी असे केले नाही, तर अमेरिका युक्रेनला पुढील साहाय्य करणे थांबवेल. (अमेरिकेकडून अशी परराष्ट्र नीती भारतानेही शिकणे आवश्यक आहे ! – संपादक)