
रुद्राक्ष नावाच्या झाडाला येणार्या फळाला ‘रुद्राक्ष’ असे म्हणतात. रुद्राक्ष म्हणजे, शिवशंकराचा तिसरा डोळा होय. ‘रूद्र + अक्ष’ यांपासून हा शब्द बनला आहे. त्याला शिवभक्तांच्या दृष्टीने रुद्राक्षाचे पुष्कळ महत्त्व आहे.
त्रिपुरासुर राक्षस माजला होता. त्याला मारण्यासाठी कालाग्नीरूद्राने ध्यान चालू केले. ते करण्यापूर्वी त्याने स्वत:चे डोळे मिटून घेतले. त्या डोळ्यांतून पृथ्वीवर अश्रू पडले. त्या अश्रूंच्या थेंबांमधून रुद्राक्षाची झाडे उगवली आणि त्यांना फळे आली.
पांढरे, तांबडे, पिवळे आणि काळे अशा ४ रंगांचे रुद्राक्ष असतात. अलाहाबादी मोठा आवळा ते अगदी लहान बोर असे त्यांचे आकार असतात. खरबुजाला जशा बाहेरून खापाच्या रेषा असतात, तशा रेषा रुद्राक्षालाही असतात. त्या खापांच्या रेषांना मुख म्हणतात. १ ते २१ पर्यंत अशी मुखे रुद्राक्षास असतात. यातील प्रत्येक रुद्राक्षास स्वतंत्र नाव असून तो वेगवेगळ्या देवतांना अधिक प्रिय आहे.’
– श्री स्वामी समर्थ (साभार : श्री त्र्यंबकेश्वर विशेषांक १९९६)