वाराणसी (काशी) येथील गंगा नदीवरील विविध घाट !

‘बनारस हे शहर ख्रिस्तपूर्व १ सहस्र २०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. ते वारणा आणि अशी या दोन नद्यांच्या मध्ये वसल्यामुळे त्याला वाराणसी म्हणून ओळखले जाऊ लागले. याला काशी-उत्तर काशी असेही म्हणतात. हे अतिशय पुरातन ज्ञानपीठ म्हणून मानले जाते. ही नगरी सर्वसमावेशक आहे. गंगानदीच्या काठावर ठिकठिकाणी मंदिरे आहेत. दिवसाच्या सूर्यप्रकाशात त्यांचे कळस चमकतांना दिसतात. वाराणसी, हे धार्मिक आचार-विचारांचे केंद्र आहे. क्षितीजावर सूर्याेदय होतो, त्या वेळी काठावर उभे असलेले लक्षावधी भाविक त्याच्यापुढे नतमस्तक होतात. नदीच्या पात्रात उतरून स्नान करतात आणि अर्घ्य देतात. गंगेत स्नान केल्यामुळे पापक्षालन होते, अशी सर्व हिंदूंची धारणा आहे. त्यामुळे ‘काशीला आयुष्यात एकदा तरी यावयास मिळावे’, अशी प्रत्येकाची इच्छा असते.

यात्रेकरूंप्रमाणे दुर्धर आजाराने पीडित लोकही येथे येतात. येथे मृत्यू आला, तर स्वर्गप्राप्ती होते, अशी त्यांची श्रद्धा असते. अर्थात् या विचाराची टिंगल करणारी माणसेही आहेत. काशीला भेट दिलेला एक पाश्चात्त्य तत्त्ववेत्ता म्हणतो, ‘वाराणसी (काशी), हे एक पवित्र क्षेत्र आहे; परंतु लोकांचे विचार आता हळूहळू उथळ बनू लागले आहेत. यामुळे अशी भीती वाटते की, तीर्थयात्रा करणे न्यून होत जाईल. एक वेळ अशी येईल की, धर्म अस्तित्वात असेल; परंतु धार्मिक क्षेत्रे असतीलच असे नाही.’

ज्ञानपीठ म्हणून मानले गेलेल्या या नगरीत विविध पंथाचे आणि विविध विचारांचे लोक येतात. येथे जातीपातीला स्थान नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालपासून कच्छपर्यंत हिंदुस्थानाच्या कानाकोपर्‍यातून भाविक श्रद्धेने येथे येतात. काशी क्षेत्र म्हणजे संस्कृत भाषेचे माहेरघर ! येथील पंडित विद्वत्तेसाठी प्रसिद्ध मानले जातात. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. वाराणसी ‘स्टेशन’ नजिकच गंगेच्या पैलतीराला घेऊन जाणारा राजघाट पूल आहे.

वाराणसी नगरी ही नेहमी शिवभूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या पवित्र ग्रंथांतून तिचा उल्लेख आढळतो. विश्वनाथ ही येथील प्रमुख देवता. शंकराची अगणित देवालये येथे जागोजागी आढळतात. येथील ज्योतिर्लिंग जगाच्या निर्मितीपासून आहे, असे मानले जाते. येथील विश्वेश्वर मंदिर परप्रांतियांनी वारंवार भुईसपाट केले; परंतु प्रत्येक वेळी ते पुनर्स्थापित केले गेले. हा प्रकार बराच काळ चालू राहिला. शेवटी सिकंदर लोदीने मंदिराच्या पुनर्स्थापनेस बंदी घातली. त्यानंतरच्या पुढील ७० वर्षांत वाराणसीमध्ये एकही मंदिर उभारले गेले नाही. त्यानंतर पूर्वी कधीही नव्हता इतका दुष्काळ पडला. सर्वत्र साथी चालू झाल्या. अगणित प्राणहानी झाली. शेवटी सर्व जनता धर्मभेद विसरून नारायण भट्ट नावाच्या साधू गृहस्थाकडे गेले आणि त्यांची करुणा भाकली. नारायण भट्टांनी तत्कालीन सत्ताधीशाची भेट घेतली. त्याला पटवून दिले की, विश्वेश्वर मंदिर नष्ट केल्यामुळे दुष्काळ पडला आणि साथींनी थैमान घातल्यामुळे अगणित जनता मृत्यूमुखी पडली. हे सर्व थांबवायचे असेल, तर मंदिराच्या पुनर्बांधणीवरील बंदी त्वरित उठवून तेथे परत मंदिर उभारले गेले पाहिजे. बंदी त्वरित उठवली गेली आणि वर्ष १५६९ च्या सुमारास विश्वेश्वर मंदिर पुन्हा उभारले गेले. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी म्हणजे वर्ष १६६९ मध्ये औरंगजेबाने ते परत भुईसपाट केले. सध्याचे विश्वेश्वर मंदिर महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधून दिले.

या मंदिराजवळ ज्ञानवापी नावाची एक विहीर आहे. असे म्हणतात की, जेव्हा मोगलांनी हे मंदिर भुईसपाट केले, तत्पूर्वी या मंदिरातील मूर्ती विहिरीत लपवण्यात आली होती. नंतर ही मूर्ती विहिरीतून काढून तिची पुनर्स्थापना करण्यात आली. विश्वनाथ मंदिरातून बाहेर पडल्यावर जवळच एक अर्धपूर्णाकृती शनेश्वराची मूर्ती आहे. मूर्तीचा चेहरा चांदीचा बनवला आहे. येथील अन्नपूर्णादेवीच्या मंदिरातील मूर्ती पितळेची असून भाविक येथे उपासना करतात. मूर्ती चांदीच्या सिंहासनावर अधिष्ठित आहे. घाटावर ‘पिशाच्च मोचन’ नावाचे कुंड असून तेथे पितरांच्या नावाने तर्पण करतात.

– श्री. कमलाकर आठल्ये (साभार : ‘श्रीगजानन आशिष’, मे २०१३)

काशी येथे स्नानासाठी गंगा नदीवर अनेक घाट आहेत; परंतु त्यांपैकी ५ घाट विशेष महत्त्वाचे मानले जातात. ते पुढीलप्रमाणे…

१. वारुणाघाट 

एक ओढा पश्चिमेकडून येऊन संगमाजवळ गंगेला मिळतो. संगमाला गंगा मिळण्यापूर्वी या ओढ्याच्या काठावर वसिष्ठेश्वर आणि तटीश्वर अशी २ शंकराची देवालये आहेत. या घाटावर स्नान करून भाविक पायर्‍या चढून आदिकेशव मंदिराकडे येतात. येथे भगवान विष्णूची गडद रंगाची मूर्ती आहे. भिंतीतील कोनाड्यात शंकराची मूर्ती आहे. जवळच असलेली शंकराची छोटी देवालये आहेत. ती हरिहरेश्वर, वेदेश्वर, नक्षलेश्वर आणि स्वस्थदीपेश्वर या नावाने ओळखली जातात. थोडक्यात सांगायचे, तर भगवान शंकर एक असला, तरी तो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.

२. पंचगंगा घाट

या घाटाजवळ यमुना, सरस्वती, किरणा आणि धूतपाप या नद्या गंगेला येऊन मिळतात; म्हणून या घाटाला पंचगंगा घाट म्हणतात. या घाटावर अनेक छोटी छोटी देवालये आहेत. त्यातील बिंदुमाधव नावाचे देवालय प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूने या ठिकाणी प्रगट होऊन अग्नीबिंदु नावाच्या भाविकाला दर्शन दिले. औरंगजेबाच्या सैनिकांनी हे देवालय भुईसपाट केले; परंतु ते परत उभारण्यात आले. कार्तिक मासात भाविक येथे गर्दी करतात.

३. मनकर्णिका घाट

हा घाट वीरतीर्थ म्हणूनही ओळखला जातो. वीरतीर्थ घाटाच्या पायर्‍या चढल्यावर मनकर्णिका घाट लागतो. जवळच भैरवकुंड नावाचा तलाव आहे. या तलावाचे पाणी प्रत्येक आठवड्याला उपसले जाते; परंतु तलावाच्या तळाशी असलेल्या अदृश्य झर्‍यामुळे तो परत पूर्ण भरतो. जवळच तारकेश्वराचे मंदिर आहे. या घाटावर स्नान करून भाविक वीरेश्वर शिवमंदिरात जाऊन पूजाअर्चा करतात.

४. दशाश्वमेध घाट

हा घाट प्रमुख घाटांपैकी एक मानला जातो. असे म्हणतात की, विश्वनिर्मात्याने या घाटावर तपश्चर्या करून अर्घ्य दिले. या घाटाजवळच दशाश्वमेध आणि शितलादेवी यांची मंदिरे आहेत. एका देवालयात गंगा, यमुना, सरस्वती, ब्रह्मा, विष्णु, महेश, नृसिंह आदींच्या मूर्ती आढळतात. या घाटाच्या उत्तरेला एक मोठे शिवालय असून त्यात अभय विनायकाची मूर्ती आहे.

५. असिसंगम घाट

असि नदी या ठिकाणी गंगेला येऊन मिळते. येथे घाटावर एक जैन मंदिरही आहे. कार्तिक मासातील कृष्ण पक्ष हा काळ येथे पूजाअर्चा, आराधना इत्यादी करण्यासाठी पवित्र मानला जातो.

याखेरीज स्मशानेश घाट आहे. तेथे स्मशानेश्वर म्हणून ओळखले जाणारे शिवालय आहे. पूर्वी येथे हिंदु स्मशानभूमी होती. हा घाट हरिश्चंद्र घाट म्हणूनही ओळखला जातो; कारण आपल्या वचनपूर्तीसाठी हरिश्चंद्राला या स्मशानात काही काळ सेवा करावी लागली होती. येथल्या तुलसी घाटावर गोस्वामी तुलसीदासजींनी स्वत:च्या आयुष्याचे अखेरचे दिवस घालवले होते. अखेर वर्ष १६८० मध्ये त्यांनी आपला देह येथेच ठेवला.