१. साधू-संत यांच्या काही प्रमुख साधना
‘साधू आणि संत यांचे एक वेगळेच जग असते. बाहेरून सामान्य दिसणार्या या साधूंचेही अनेक नावे आणि प्रकार आहेत. काही साधू त्यांच्या हठयोगासाठी, तर काही त्यांच्या संप्रदायांच्या नावाने ओळखले जातात. साधू आणि संत त्यांच्या देहाला कष्ट देऊन दिवस-रात्र ईश्वराच्या उपासनेत लीन रहातात. साधू-संत अनेक प्रकारची साधना करतात. त्यापैकी काही प्रमुख साधना खालीलप्रमाणे आहेत.

अ. दंडी : हे साधू त्यांच्या समवेत एक दंड (भगव्या कापडाने झाकलेला लाकडी दंड) आणि कमंडलू (पाण्याचे भांडे) ठेवतात. ते कोणत्याही धातूच्या वस्तूला स्पर्श करत नाहीत. ते दिवसातून केवळ एकदाच भिक्षा मागण्यासाठी जातात.
आ. अलेस्बिया : हा शब्द आलेखमध्ये येतो. संन्यासी भिक्षा मागतांना हा शब्द उच्चारतात. ते तोडा, छल्ला इत्यादी विशिष्ट प्रकारचे अलंकार परिधान करतात. ते चांदी, पितळ किंवा तांबे यांपासून बनलेले असतात. याखेरीज लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते त्यांच्या कमरेभोवती लहान घंटाही बांधतात.
इ. उर्ध्वमुखी : हे साधू त्यांचे पाय वर आणि डोके खाली ठेवतात. ते झाडाच्या फांदीला पाय बांधून लटकतात.
ई. धारेश्वरी : हे साधू रात्रंदिवस उभे रहातात, उभे राहून जेवतात आणि तशा स्थितीतच झोपतात. अशा संतांना ‘हठयोगी’असेही म्हणतात.
उ. ऊर्ध्वबाहु : हे साधू त्यांच्या इष्ट देवतेला प्रसन्न करण्यासाठी एक किंवा दोन्ही हात वर करून ठेवतात.
ऊ. नक्खी : जे साधू बराच काळ नखे कापत नाहीत, त्यांना ‘नक्खी’ म्हणतात. त्यांची नखे सामान्य लोकांच्या नखांहून कित्येकपट लांब असतात.
ए. मौनव्रती : हे साधू मौन राहून ध्यान करतात. त्यांना काही सांगायचे असेल, तर ते कागदावर लिहून ठेवतात.
ऐ . जलसाजीवी : हे साधू सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नदी किंवा तलाव यांच्या पाण्यात उभे राहून तपस्या करतात.
ओ. जलधारा तपसी : ते साधू खड्ड्यात बसतात आणि त्यांच्या डोक्यावर एक घागर ठेवतात. त्याला छिद्रे असतात. या घागरातील पाणी छिद्रांमधून त्यांच्यावर सतत पडत रहाते.
औ. फलधारी : हे साधू केवळ फळांवर जगतात. त्यांचे मुख्य उद्दिष्ट हे त्यांच्या अन्न सेवनावर नियंत्रण ठेवणे आहे.
अं. दूधधारी : हे साधू केवळ दूध पिऊन जगतात.
क. अलुना : हे साधू जेवणात मीठ सेवन करत नाहीत.
ख. सुस्वर : हे साधू भिक्षा मागण्यासाठी नारळापासून बनवलेले भांडे किंवा खापर वापरतात आणि भिक्षा देतांना विशिष्ट पदार्थ जाळतात.
ग. त्यागी : हे साधू भिक्षा मागत नाहीत. त्यांना जे मिळते त्यावर ते जगतात.
घ. अबधुतनी : या महिला संत आहेत. त्या माळ घालतात आणि त्रिपुंड लावतात, तसेच भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात.
च. टिकरनाथ : हे साधू भैरवाची पूजा करतात आणि मातीच्या भांड्यांमध्ये अन्न खातात.
छ. भोपा : हे साधू भिक्षा मागतांना त्यांच्या कमरेला किंवा पायाला घंटा बांधतात, भैरवाच्या स्तुतीसाठी नाचतात आणि गाणी गातात.
यांसह परमहंस, दशनामी नगर, डंगाली, अघोरी, आकाशमुखी, करलिंगी, औधड, गुंधार, भूखर, कुरुर, घरबारी संन्यासी, तूर संन्यासी, मानस संन्यासी, अंत संन्यासी, क्षेत्र संन्यासी, दशनामी घाट आणि चंद्रवत् असे साधूंच्या साधनेचे प्रकार आहेत.

२. संप्रदायांनुसार कपाळावर टिळा लावण्याचे विविध प्रकार
साधू-संतांमध्ये शृंगाराचे एक विशेष महत्त्व आहे, विशेषत: टिळ्याचे ! वैष्णव संप्रदायातील साधू आणि संत उभे टिळे लावतात. यामध्येही आखाडे आणि उपपंथ यांनुसार आकार किंवा रंग यांमध्ये पालट असतो. वैष्णव संप्रदायात टिळ्याचे अनेक प्रकार आहेत. शैव पंथात आडवा टिळा लावला जातो. उदासीनमध्ये उभ्या आणि आडव्या दोन्ही प्रकारचे टिळे लावता येतात. साधू आणि संत टिळा लावतांना विशेष एकाग्रता दाखवतात. त्यांच्याकडून टिळा इतक्या कौशल्याने लावला जातो की, तो जवळजवळ प्रतिदिन सारखाच दिसतो.
टिळा लावणे, ही हिंदु संस्कृतीची ओळख समजली जाते. या साधू-संतांची ओळख त्यांच्या टिळ्यांवरून होते, हे अनेकांना ठाऊक नसेल. भारतीय संस्कृतीत कपाळावर टिळा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. टिळा लावणे, ही हिंदु संस्कृतीची ओळख समजली जाते. हे टिळे एक-दोन प्रकारचे नसून त्यांचे ८० हून अधिक प्रकार आहेत. त्यांपैकी अधिकाधिक ६४ प्रकारचे टिळे वैष्णव साधू लावतात. हिंदु धर्मातील अनेक संतांची विचारसरणी, पंथ आणि संप्रदाय आहे. त्यांचे टिळे लावण्याची पद्धतही वेगळी आहे.
अ. शैव : शैव कपाळावर चंदनाची तिरकी रेषा लावतात, तसेच त्यावर त्रिपुंडही लावले जाते. बहुतेक शैव संत या प्रकारचा टिळा लावतात.
आ. शाक्त : शक्तीची पूजा करणारे ऋषि चंदन किंवा कुंकू यांऐवजी सिंदूरचा टिळा लावतात. असे समजतात की, कुंकू साधकाची शक्ती वाढवते आणि त्याच्या उग्रतेचे प्रतीकही आहे. तज्ञांच्या मते बहुतेक भाविक कामाख्यादेवीच्या सिद्ध कुंकवाचा वापर टिळा लावण्यासाठी करतात.
इ. वैष्णव : वैष्णवांमध्ये टिळा लावण्याचे प्रकार सर्वाधिक आढळतील. यात सुमारे ६४ प्रकारचे टिळे लावले जातात. काही महत्त्वाचे टिळे खालीलप्रमाणे आहेत.
इ १. लालश्री टिळा : या प्रकारच्या टिळ्यामध्ये आजूबाजूला चंदन लावले जाते आणि मध्यभागी कुंकू किंवा हळदीने एक रेषा काढली जाते.
इ २. विष्णुस्वामी टिळा : हा टिळा लावण्यासाठी भुवयांच्या मध्ये कपाळावर २ रुंद रेषा बनवल्या जातात.
इ ३. रामानंद टिळा : हा टिळा लावण्यासाठी प्रथम विष्णुस्वामी टिळा लावला जातो. त्यानंतर मध्यभागी कुंकू लावून एक उभी रेष बनवली जाते.
इ ४. श्यामश्री टिळा : हा टिळा भगवान श्रीकृष्णाचे अनुयायी लावतात. हा टिळा लावण्यासाठी प्रथम गोपीचंदन लावले जाते आणि मध्यभागी एक जाड काळी रेषा ओढली जाते.
इ ५. इतर टिळे : या व्यतिरिक्त इतर काही प्रमुख टिळे आहेत, जे साधू आणि संत लावतात. अनेक साधू आणि संत भस्माचा टिळा लावतात.
३. साधू आणि संत यांची वेशभूषा
अ. भारतीय हिंदु साधूंचा एक विशेष पोशाख असतो, जो प्रत्येक साधूसाठी वेगळा असतो. काही साधू डोक्यावर केवळ भस्म लावतात, काही कानातील घालतात, काही माळा घालतात आणि काही जण अघोरींसारखे पूर्णपणे नग्न असतात अन् या सर्व गोष्टींपासून लांब रहातात.
आ. जपमाळ : साधू समाजातही जपमाळेचे विशेष महत्त्व आहे. वैष्णव पंथातील बहुतेक लोक तुळशीची माळ घालतात, तर शैव लोक रुद्राक्षाची माळ वापरतात. उदासीन आखाड्यामध्ये कोणतीही सक्ती नसते. या माळा आखाडा किंवा उपसंप्रदाय यांच्या परंपरेनुसारही पालटतात.
इ. जटा : बरेच नागा साधू मोठी जटा ठेवतात. जाड जटांची पुष्कळ काळजी घेतली जाते. त्यावर काही जण रुद्राक्षांची माळा घालतात, तर काही फुलांच्या माळा घालतात. त्यामुळे त्यांना आकर्षक रूप मिळते.
ई. कमंडलू, चिमटा आणि त्रिशूळ : काही साधू आणि संत कमंडलू बाळगतात, तर काही त्रिशूळ किंवा चिमटा बाळगतात. काही साधू धातूपासून बनवलेला कमंडलू वापरतात, तर काही तो भोपळ्यापासून बनवलेला वापरतात. नागा साधूंनाही योद्धा समजले जाते. अनेक साधू तलवार, त्रिशूळ आणि फरशा ही शस्त्रे बाळगतात.
उ. भस्म : भगवान शिव भस्माचा वापर करतात. शैव संप्रदायातील नागा साधूंना त्यांच्या देवतेप्रमाणे भस्म लावण्याची अतिशय आवड असते. प्रतिदिन अंघोळ केल्यानंतर ते त्यांच्या अंगावर भस्म फासतात. उदासीन आखाड्यामध्येही अनेक साधू अंगाला भस्म लावतात.
लेखक : श्री. निखिलेश मिश्रा, उत्तरप्रदेश.
(साभार : ‘खबरोंका आकलन’ ब्लॉग)