सागरी किनारी असलेली अवैध बांधकामेही हटवणार !- नितेश राणे, मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री

अवैध मासेमारी रोखण्यासाठी आणि सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्ष कार्यरत !

मुंबई, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्रातील समुद्रात होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र अमंलबजावणी कक्ष स्थापन केला आहे. मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयीची अधिकृत घोषणा केली. कसाबसह मुंबईमध्ये आलेल्या आतंकवाद्यांनी सागरी मार्गानेच मुंबईमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे देशासाठी घातक असलेली सागरी किनार्‍यावरील अवैध बांधकामेही हटवण्यात येतील. याविषयी अधिकार्‍यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी या वेळी दिली.

नितेश राणे

याविषयी सविस्तर माहिती देतांना राणे म्हणाले, ‘‘अवैध मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारीला धोका निर्माण झाला आहे. कोकणातील अनेक मासेमार अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायदेशीर लढाही देत आहेत. महाराष्ट्रात होणारी अवैध मासेमारी रोखण्याविषयी सागरी किनारा असलेल्या कोकणातील ७ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मत्स्य अधिकारी यांची मस्त्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असणार आहे. अन्य राज्यांतून यांत्रिक नौकांद्वारे (ट्रॉलरद्वारे), तसेच प्रकाशझोतात (एल्इडीद्वारे) होणारी अवैध मासेमारी यापुढे रोखण्यात येईल.’’

नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण ९७७ अनधिकृत नौकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ कोटी ८७ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती मत्स्योद्योग आणि बंदरे विकास विभागाकडून या वेळी देण्यात आली.

देवगड येथे मत्स्यव्यवसाय महाविद्यालय होणार !

कोकणात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाची स्थापना केली जाणार आहे. देवगडमध्ये वाघोटन येथे यासाठी भूमी निश्चित करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यापासून हे महाविद्यालय कार्यरत होईल. यासाठी अर्थसंकल्पामध्ये १०० कोटी रुपये निधी संमत करण्यात येणार आहे. हे महाविद्यालय दापोली कृषी विद्यापिठाशी संलग्न असेल. याविषयी कृषीमंत्र्यांसमवेत चर्चाही झाली आहे, अशी माहिती या वेळी मंत्री राणे यांनी दिली.