रत्नागिरी जिल्ह्यात आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम शासनाची ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा

शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी – १९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी साजर्‍या होणार्‍या शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमाच्या अंतर्गत रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सकाळी  ८ वाजता ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. या पदयात्रेत एन्.सी.सी., एन्.एस्.एस्., नेहरू युवा केंद्र, स्काऊट अँड गाईड, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे प्रारंभ झाल्यावर मारुती मंदिर, जिल्हा शासकीय रुग्णालय, टिळक आळी, शिवसृष्टी, रत्नदुर्ग किल्लामार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथे आल्यावर पदयात्रेची सांगता होणार आहे. अशाप्रकारेच उपविभागीय स्तरावर देखील नियोजन असणार आहे.

बाजारपेठ, पाचल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन 

श्रीराम सेवक मंडळ, पाचल पंचक्रोशीच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १८ फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी हरळ फाटा ते पाचल बाजारपेठ दुर्गादौड (मशाल यात्रा) काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजता शिवरायांची पूजा, अभिषेक, आरती, त्यानंतर आजिवली ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (जवळेथर फाटा) पाचलपर्यंत वाहन फेरी, ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंपळेश्वर ते पाचल बाजारपेठ पायी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी ३ नंतर वक्तृत्व स्पर्धा, हळदी-कुंकू आणि त्यानंतर मर्दानी खेळ, असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना समस्त शिवप्रेमींनी उपस्थित राहून शिवरायांना मानवंदना द्यावी, असे आवाहन श्रीराम सेवक मंडळ, पाचल पंचक्रोशी यांनी केले आहे.

लांजा येथे मराठा महासंघाच्या वतीने शिवजयंती उत्सव

लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १९ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता शिवप्रतिमेचे पूजन, शहरातील केदारलिंग मंदिर येथून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मराठा समाज बांधव आणि शिवप्रेमी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे अन् सरचिटणीस विजय पाटोळे यांनी केले आहे.

गुहागर येथे विविध कार्यक्रम

गुहागर येथे शिवतेज फाऊंडेशन, गुहागर आणि गुहागरवासीय यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवपादुका पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शिवपादुकांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर बाजारपेठ मार्गे श्री देव व्याडेश्वर मंदिर, वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिर येथे आगमन होईल. येथे शिवरायांच्या पादुका आणि श्री दुर्गा भवानीमाता यांचे विधीवत् पूजन अन् भेट सोहळा होणार आहे. त्यानंतर पादुका पालखी मिरवणूक वरचापाट बाग, रानवीमार्गे अंजनवेल बाजारपेठ येणार आहे. गुहागर आणि श्रृंगारतळी येथून आलेल्या मिरवणुका गोपाळगडापर्यंत नेण्यात येणार आहेत. तेथे पादुका पूजन आणि ध्वजारोहण करून शिवजयंती उत्सवाची सांगता होणार आहे.