नाशिक – येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ५०० हून अधिक आखाडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने येथे गोदावरीच्या घाटांचा विस्तार केला जाणार आहे. १५ फेब्रुवारी या दिवशी ४५ उच्च स्तरीय अधिकार्यांच्या शिखर समितीसह बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा आढावा घेतला.
नाशिक येथे होणार्या कुंभमेळ्याची सिद्धता आतापासूनच आरंभ झाली आहे. प्रयागराज येथील यंत्रणेची पहाणी करण्यासाठी येथील अधिकारी वर्ग प्रयागराज येथे १८ आणि १९ तारखेला जाणार आहेत. दीर्घ, मध्यम आणि लघु कालावधीसाठी कामाची आखणी केली जाणार आहे. मलनिःस्सारण व्यवस्था, रस्ते, वाहनतळ साधूग्राम आदी गोष्टींसाठी आतापासून सिद्धता चालू करावी लागेल. शौचालये, गर्दीचे नियोजन, आरोग्य यंत्रणेची उभारणी, गोदीवरीचे पाणी शुद्ध करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आदी कामांनाही आरंभ झाला आहे.
विविध विभागांचे ५० अधिकारी सिंहस्थ कुंभसाठी पहाणी दौरा करत आहेत. प्रयागराज येथील महाकुंभच्या पार्श्वभूमीवर या कुंभलाही गर्दी होण्याची शक्यता आहे. तेथील चेंगराचेंगरीसारख्या अडचणी अन्य ठिकाणी येऊ न देण्यासाठी अभ्यास केला जाणार आहे.