पुणे आणि सोलापूर जिल्हा प्रशासनांची संयुक्त कारवाई

इंदापूर (पुणे) – उजनी धरणातील अवैध वाळू उपसा करणार्या बोटीवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. वाळू उपसा करणार्या १३ बोटी जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करून उद्ध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांतील महसूल विभाग अन् पोलीस प्रशासन यांकडून मोठ्या फौजफाट्यासह करण्यात आली.
उजनी धरणामध्ये गेल्या ४५ वर्षांपासून साचलेला मोठा वाळू साठा उपलब्ध आहे. अनेक दिवस धरणातून वाळूची चोरी चालू होती. पुणे आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून ही चौथी कारवाई आहे. जलाशयातील इंदापूर तालुक्यातील माळवाडी जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे पाठलाग करून १३ बोटी पकडल्या. त्या सर्व बोटी स्फोट करून बुडवण्यात आल्या, तसेच माळवाडी जॅकवेलजवळील ३ बोटी पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.