संपादकीय : अश्लीलविरांवर पायबंद हवाच !

यू ट्यूब वाहिनी चालवून कोट्यवधी रुपयांची कमाई करणारा रणवीर अलाहाबादिया याने एका कार्यक्रमात विनोदाच्या नावाखाली अतिशय खालच्या थराला जाऊन वक्तव्ये केली. त्यामुळे भारतभरातील वातावरण तापले आहे. त्याच्या या कृतीमुळे अनेकांनी त्याला ‘अनफॉलो’ केले, तर काही प्रसिद्ध लोक, जे त्याच्या वाहिनीवर मुलाखत द्यायला जाणार होते, त्यांनी मुलाखत न देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक पोलीस ठाण्यांत त्याच्या विरोधात एफ्.आय.आर्. (प्रथमदर्शी अहवाल) प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहेत. विविध माध्यमांद्वारे त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. या घटनेनंतर सामान्य जनता, प्रसारमाध्यमे, सरकार, विरोधी पक्ष आदी सर्वच स्तरांवरून ‘अश्लीलतेवर चाप आणायला हवा’, अशी एकमुखाने मागणी केली जात आहे. भारतात एखादी समस्या किंवा एखादे सूत्र यांविषयी सरकार, विरोधक आणि जनता यांचे एकमत झाल्याचे फार अल्प वेळा पहायला मिळते. त्यामुळे ही सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल. लोकांच्या रोषाचा फटका अश्लील वक्तव्ये करणारा रणवीर अलाहाबादिया, समय रैना यांनाच बसला, असे नाही, तर अश्लाघ्य आशय असणार्‍या अनेक वाहिन्यांवर बंदी घालण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे. मराठीतील ‘भारतीय डिजिटल पार्टी’ या यू ट्यूब वाहिनीवरील ‘अतिशय निर्लज्ज कांदे पोहे’ या कार्यक्रमाचा १४ फेब्रुवारी या दिवशी प्रसारित होणारा भाग रहित करण्यात आला आहे. जागृत जनता एवढ्यावरच समाधानी नाही. ‘या वाहिनीवरून अश्लील साहित्याचे प्रसारण होत असल्यामुळे या वाहिनीवरच बंदी घालण्यात यावी’, अशी मागणी केली जात आहे. सरकारही याविषयी सजग झाल्याने, तसेच या प्रकरणाची संसदेतही चर्चा झाल्याने हा विषय धसास लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी विनोदाच्या नावाखाली जी अश्लीलता प्रसारित होत असे, त्याला युवा वर्गाचे समर्थन मिळत असे. ‘काका-काकू लोकांना असले विनोद समजणार नाहीत’, असे युवावर्गाकडून सांगितले जात होते. त्यामुळे अश्लील लिखाणाची निर्मिती करणार्‍यांना बळ मिळत असे. रणवीर प्रकरणात मात्र युवावर्गाने याला विरोध करून ठाम भूमिका घेतली. त्यामुळेच रणवीर आणि त्याच्यासारख्या अश्लीलतेला प्रोत्साहन देणार्‍यांची कोंडी झाली आहे.

विरोधकही सकारात्मक !

सध्या ‘ऑनलाईन’ व्यासपिठावरून जे अश्लील आणि संस्कृतीशून्य लिखाण प्रसारित होते, त्यावर चाप आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यावर चाप आणण्यासाठी कायदे करणे किंवा शिक्षेचे प्रावधान करणे, यांसारख्या मागण्या आता नवीन नाहीत. सरकारनेही नियमांमध्ये काही ठराविक सुधारणा केल्या आहेत; मात्र त्या पुरेशा नाहीत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा जो ढोल जोरजोरात बडवला जातो, त्यामुळे अश्लीलतेचे प्रसारण करणार्‍यांचे फावते. रणवीर प्रकरणात मात्र अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा झेंडा मिरवणारे, पुरो(अधो)गामी, स्त्रीमुक्तीवादी असे सर्वजण सुरात सूर मिसळून अशांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे रणवीर अलाहाबादिया याला असलेले वलय ! ‘या आधुनिक युगात हिंदु धर्म, भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा प्रसार करणारा’, अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्याच्या ‘बियर बायसेप्स’ आणि ‘टी.आर्.एस्.’ या यू ट्यूब चॅनल्सवरून धर्म, संस्कृती, इतिहास, आरोग्य, उद्योग आदी विविध विषयांवर त्या क्षेत्रातील संबंधित व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात येतात. त्याच्या संवाद कौशल्यामुळे अल्प कालावधीमध्ये त्याला उदंड लोकप्रियता मिळाली. त्यासह त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बेस्ट क्रिएटर अवॉर्ड’ही प्राप्त झाला होता. त्याही पुढे जाऊन रणवीर याने हिंदु धर्मातील विविध पंथ, ध्यान-धारणा, देवता यांविषयी मुलाखती घेतल्याने रणवीर अलाहाबादिया याच्याकडे हिंदु धर्माचा प्रसार करणारा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून पाहिले गेले. रणवीर यानेही ‘मी हिंदु धर्मीय असून साधना करतो’, असे वारंवार सांगितले. त्यामुळे मोदी, भाजप आणि हिंदु विरोधक यांच्याकडून त्याच्यावर बरीच टीका होत असे. अश्लील वक्तव्ये करून रणवीर याने या सर्व विरोधकांच्या हाती आयते कोलित दिले. या प्रकरणात भारतातील साम्यवादी, उजवे आदी सर्व एकमुखाने त्याला विरोध करत आहेत. त्याला विरोध करण्यामागे राजकारण काहीही असो, केंद्र सरकारने तवा तापला आहे, हे लक्षात घेऊन ऑनलाईन प्रसारण होणार्‍या अशा कार्यक्रमांवर वा लिखाणावर चाप बसवण्यासाठी कठोर कायदा करणे अपेक्षित आहे.

हिंदूंना गृहीत धरणे चुकीचे !

सध्या हिंदूंमध्ये जागृती होऊ लागल्याने हिंदुत्व, हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांवर विविध माध्यमांतून बोलले किंवा लिहिले जात आहे. सध्या वाहिन्यांनाही त्यांचा ‘टी.आर्.पी.’ वाढवण्यासाठी हिंदुत्वाची कास धरावी लागत आहे. त्यामुळे पूर्वी हिंदुत्वाच्या नावाने नाके मुरडणार्‍या मंडळींनी हिंदुत्वाचा बाजार मांडून स्वतःची तुंबडी भरण्याचे काम चालू केले आहे. यू ट्यूबवर तर अशा लोकांचे पेव फुटले आहे. बर्‍याचदा सामान्य हिंदूही सारासार विचार न करता अशा लोकांच्या आहारी जातात. रणवीर अलाहाबादिया याला होणार्‍या विरोधातून अशा लोकांनी शहाणे व्हावे. स्वतःची हिंदुत्वाची प्रतिमा बनवून ‘आम्ही काहीही केले, तरी जनता ते खपवून घेईल’, असे वाटणार्‍यांनी आता ताळ्यावर यावे. आता जनता अशांना भीक घालणार नाही. रणवीर अलाहाबादिया याने केवळ वयाच्या ३१ व्या वर्षी जी प्रतिमा निर्माण केली होती, ती त्याच्या एका गंभीर चुकीमुळे धुळीला मिळाली आहे. ‘आयुष्यात यशस्वी झालो, तरी प्रत्येक क्षणी पाय भूमीवर ठेवून का वागायला हवे’, यादृष्टीने आजच्या पिढीतील युवक या घटनेतून बोध घेऊ शकतात.

सध्याच्या तणावाच्या वातावरणात थोडा विरंगुळा मिळावा, ताणविरहित काही क्षण जगता यावेत, यासाठी लोक काही तरी विनोदी वाचणे, ऐकणे किंवा पहाणे पसंत करत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात वातावरण हलके-फुलके ठेवण्यासाठी विनोदाला महत्त्व आहेच; मात्र विनोदाच्या नावाखाली जर एखाद्याने पातळी घसरून अरबट-चरबट वक्तव्ये केली आणि कुणी त्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जनतेवर थोपवण्याचा प्रयत्न केला, तर ते रोखणे आवश्यक आहे. रणवीर अलाहाबादिया याने क्षमा मागितली आहे; मात्र ती तोंडदेखली आहे. त्यामुळे त्याला शिक्षा होईल का ?, हे येणारा काळच सांगेल. जनतेने मात्र अश्लीलता पसरवणार्‍या लोकांच्या विरोधात कठोर कायदा होईपर्यंत स्वस्थ बसू नये एवढेच !

अश्लील लिखाणाचा प्रसार करणार्‍यांना रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा बनवून त्याचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक !