Polluted Indrayani And Chandrabhaga : ऐन माघवारीच्या तोंडावर इंद्रायणी आणि चंद्रभागा दोन्ही नद्या प्रदूषित !

आळंदी येथील इंद्रायणी नदीवर पसरलेला पांढरा फेस डावीकडे तर उजवीकडे चंद्रभागेवर पसरलेले घाणीचे साम्राज्य !

पंढरपूर (सोलापूर) : ८ फेब्रुवारीला होणार्‍या माघवारीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे. आळंदी येथील इंद्रायणी नदीवर काही दिवसांपूर्वी पांढरा फेस पसरला होता, तर चंद्रभागा येथील पाणीही त्यात मिसळणार्‍या नाल्यामुळे खराब झाले आहे. या दोन्ही नद्यांमधील पाणी हे वारकरी मोठ्या श्रद्धेने तीर्थ म्हणून प्राशन करतात आणि त्यात स्नानही करतात. सध्या या दोन्हीही नद्या प्रदूषित असल्याने त्यात स्नान केल्यावर वारकर्‍यांना त्वचारोग होण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे हे प्रदूषण तसेच असून प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधी स्तरांवरील अनास्थाच याला कारणीभूत आहे.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ५ घंट्यांहून अधिक काळ !

माघवारीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर येथे येण्यास प्रारंभ झाला आहे. प्रशासन नेहमीप्रमाणे वारकर्‍यांसाठी आम्ही जय्यत सिद्धता केली असल्याचे दावे करत असले, तरी श्री विठ्ठलाच्या चरणदर्शनासाठी सध्या ५ घंट्यांहून अधिक काळ लागत आहे. उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात वाढत असून नगरपरिषदेकडून पुरवण्यात येणारे पाणी स्वच्छ नसल्याने भाविकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे.

एकीकडे सामान्य वारकर्‍यास रांगेतूनच दर्शन घ्यावे लागते, तर दुसरीकडे कुणी अतीमहनीय व्यक्ती आल्यास तिला मात्र रांगेत उभे न रहाता थेट दर्शन मिळते, तसेच त्यांच्या गाड्याही थेट मंदिर परिसरात येतात. यामुळे श्री विठ्ठलाचा भक्त असलेला सामान्य वारकरी मात्र नेहमी किमान सुविधांपासून वंचितच रहात आहे.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठ असणार्‍या महायुती सरकारच्या काळात नद्यांचे प्रदूषण संपून वारकर्‍यांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, ही भाविक आणि वारकरी यांची अपेक्षा आहे !