थोडक्यात महत्त्वाचे : डंपरचालकाच्या धडकेत १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ! सिमेंट मिक्सरच्या अपघातात मुलीचा मृत्यू…

डंपरचालकाच्या धडकेत १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

नवी मुंबई – सीबीडी सेक्टर आठ येथील डंपरचालकाने सायकलवरून शाळेत जाणार्‍या १२ वर्षांच्या मुलाला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला. ‘त्याला अटक केल्याविना मृतदेह कह्यात घेणार नाही’, अशी भूमिका पालकांनी घेत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता. डंपरचालकावर गुन्हा नोंदवून पोलिसांनी पालकांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी मृतदेह स्वीकारला.


सिमेंट मिक्सरच्या अपघातात मुलीचा मृत्यू

मुंबई – वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात सिमेंट मिक्सरने दिलेल्या जोरदार धडकेत १० वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या अपघातात तिचा ६ वर्षांचा भाऊही घायाळ झाला आहे. दोन्ही भावंडांना शाळेतून ने-आण करण्याचे दायित्व एका रिक्शाचालकावर होते. रिक्शाचालक त्यांना रिक्शाऐवजी दुचाकीवरून घरी आणत असतांना हा अपघात झाला. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालकासह रिक्शा चालकाविरोधातही निष्काळजीपणाचा गुन्हा नोंद केला आहे.


जिवंत काडतुसे बाळगणारा धर्मांध अटकेत !

मुंबई – पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि २३ ग्रॅम मॅफेड्रोन या अमली पदार्थासह उजेर नियाज खान (वय २७ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. मॅफेड्रोनचे मूल्य ४ लाख ६० सहस्र रुपये इतके आहे. त्याच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा आणि भारतीय हत्यार बंदी कायदा याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

संपादकीय भूमिका : अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !


ओळखसत्रात आक्रमणकर्त्याला ओळखले !

अभिनेते सैफ यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण !

मुंबई – अभिनेते सैफ अली खान यांच्या घरात काम करणार्‍या परिचारिका एलियामा फिलिप उपाख्य लिमा आणि आया जुनू यांनी ओळखसत्रात आक्रमणकर्त्याला ओळखले. मुंबईतील आर्थररोड कारागृहात हे ओळखसत्र करण्यात आले. त्या दोघींनीही अटकेतील आरोपी महमंद शरीफुल इस्लाम फकीर याला ओळखले.


खटला चालवायचा नाही !

आरोपी अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांची भूमिका

बदलापूर – येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. आता यापुढे याविषयीचा खटला चालवायचा नाही, अशी भूमिका त्याच्या आई-वडिलांनी घेतली आहे. ‘आमच्यावर कुणाचाही दबाव नाही; पण आम्हाला ही धावपळ आता जमत नाही’, असे मत त्यांनी मांडले. या प्रकरणावर ७ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी होणार आहे.