अयोध्या – श्री रामलल्लाच्या दर्शनाचे वेळापत्रक पालटण्यात आले आहे. आता मंदिर प्रतिदिन सुमारे १६ घंटे खुले राहील. शृंगार आरतीनंतर मंदिराचे प्रवेशद्वार सकाळी ६ वाजता भाविकांसाठी उघडले जाईल. रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना श्री रामलल्लाचे दर्शन घेता येईल. या कालावधीत संध्याकाळच्या आरतीसाठी मंदिर केवळ १५ मिनिटे बंद राहील. यापूर्वी मंदिर सकाळी ७ ते रात्री ९.३० पर्यंत उघडे असायचे. मंदिराचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले.
१. प्रयागराज महाकुंभातून परतणार्या भाविकांच्या गर्दीमुळे वेळापत्रकात पालट करण्यात आल्याचे राम मंदिर ट्रस्टने म्हटले आहे.
२. श्री रामलल्लाची मंगला आरती पहाटे ४ वाजता होईल. मंदिराचे प्रवेशद्वार सकाळी ६ वाजता उघडले जाईल. त्यानंतर शृंगार आरती होईल. यानंतर भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता येईल.
३. दुपारी १२ वाजता भोग आरती होईल. यानंतर भाविकांना पुन्हा श्री रामलल्लाचे दर्शन घेता येईल.
४. संध्याकाळी ७ वाजता संध्याकाळची आरती होईल. या काळात मंदिर १५ मिनिटांसाठी बंद राहील
५. रात्री १० वाजता शयन आरती होईल. यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातील.
६. विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांच्या मते नवीन प्रणालीमध्ये दर्शनासाठी प्रवेश बिर्ला धर्मशाळेसमोरील मुख्य प्रवेशद्वारातून असेल.