यात्रेतील महाप्रसादातून ७०० जणांना विषबाधा : परिस्थिती नियंत्रणात !

कोल्हापूर – येथील शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावचे ग्रामदैवत श्री कल्याणताईदेवीची यात्रा चालू आहे. या यात्रेच्या निमित्ताने ४ फेब्रुवारीला दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. हा महाप्रसाद घेतल्यावर काही नागरिकांना मध्यरात्रीनंतर उलटी, जुलाब यांचा त्रास चालू झाला. रुग्णांची संख्या वाढल्यावर विषबाधेची घटना समोर आली. त्रास होत असलेल्या रुग्णांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. ही घटना समजताच आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी तात्काळ भाविकांची भेट घेतली. रुग्णालय प्रशासनाने कोणताही रुग्ण गंभीर नसून पूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाच्या पथकाने गावातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन माहिती घेतली.