
मुंबई – एका युट्यूब वाहिनीवर पॉडकॉस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलतांना ‘महाराज आगरा येथून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नाही. महाराज चक्क लाच देऊन सुटले. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या, याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. या गोष्टी रंजक रूपात करून सांगितल्या. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही’, असे वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले होते. यावर राज्यभरातून टीका झाल्यावर त्यांनी क्षमा मागितली आहे.
राहुल सोलापूरकर म्हणाले, ‘‘दोन मासांपूर्वी मी मुलाखत दिली. त्या दरम्यान इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात, याविषयी वक्तव्य केले होते. त्या मुलाखतीमध्ये बोलतांना मी ‘लाच’ हा शब्द वापरला. त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे मनातही येणार नाही.’’
राहुल सोलापूरकरसारख्या व्यक्तीची जीभ हासडली गेली पाहिजे ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

देहलीतील पत्रकार परिषदेत भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘जगाच्या पाठीवर एकमेव महापुरुष होऊन गेला, ज्यांनी ३५० वर्षांपूर्वी विचार दिला. भारतासह अनेक देश त्यांच्या विचारांचे अनुसरण करतात. तरीही त्यांच्याविषयी गलिच्छ विधाने केली जातात. राहुल सोलापूरकरने महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे शिवभक्तांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अशा व्यक्तीची जीभ हासडली गेली पाहिजे. महापुरुषांविषयी बोलणार्या विकृतांमध्ये वाढ झाल्यास देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली होती की, अशी विधाने करणार्यांवर देशद्रोहाची कारवाई करावी. छत्रपती शिवरायांचे विचार न जपल्यास देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.’’